आताच सावरा, अन्यथा खूप उशीर होईल! बांगलादेशच्या लष्करप्रमुखांची मोहम्मद युनूस सरकारला चेतावणी

शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशमधील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. बांगलादेशमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. यामुळे उद्विग्न होत बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार उज जमा यांनी मोहम्मद युनूस सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

बांगलादेशमध्ये सर्वकाही आलबेल नाही, अस म्हणत लष्करप्रमुख जनरल वकार उज जमा यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. देश संकटात असून याला राजकीय उलथापालथ कारणीभूत आहे. राजकीय नेत्यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही आणि ते आपापसात भांडत बसले आहेत. अशावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी लष्करावर येते, असे ते म्हणाले.

देशामध्ये जी अराजकता निर्माण झाली आहे, त्याला आपणच कारणीभूत आहोत. पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. कारण त्यांचे सहकारी एकतर खटल्यांचा सामना करत आहेत किंवा तुरुंगात आहेत, असे जनरल वकार उज जमा म्हणाले. यावेळी त्यांनी बांगलादेशी नागरिकांना शांततेचेही आवाहन केले.

नागरीक आपापसात भांडत बसले तर देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडतेला तडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी शांतता अबाधित ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांवरही तोफ डागली.

सर्व पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे उपद्रवी लोकांना पोषक वातावरण झाले आहे. आपण काहीही केले तरी कुणी आपले काहीही वाकडे करू शकणार नाही असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे आपापसात भांडण करत बसू नका, अन्यथा खुप उशीर होईल. नंतर मी चेतावणी दिली नाही असे म्हणू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

Comments are closed.