इबोलाच्या धोक्यामुळे गाईडलाईन्स जारी – TMarathiNews
आफ्रिकन खंडातील बाधित भागांमध्ये प्रवास टाळण्याची सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इबोला या विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेऊन सदर विषाणूला ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केले आहे. याच अनुषंगाने भारतीय आरोग्य मंत्रालयानेही एक उच्चस्तरीय सूचना जारी करताना भारतीय नागरिकांना आफ्रिकन खंडातील बाधित भागांमध्ये प्रवास न करण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे. वाढत्या संसर्गामुळे भारत सरकारने रविवारी एक अधिकृत निवेदन जारी करून आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये कोणताही अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
जग कोविड-19 महामारीच्या परिणामातून सावरत असतानाच आणखी एका प्राणघातक विषाणूने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढवली आहे. इबोला विषाणूचा संसर्ग वेगाने पसरतो आणि तो प्राणघातक ठरू शकतो. सुरक्षिततेच्या कारणास्तव पुढील सूचना मिळेपर्यंत डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये जाणे टाळणेच उत्तम असल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त सध्या या देशांमध्ये वास्तव्य करणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना स्थानिक आरोग्य संस्थांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि खबरदारीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Comments are closed.