आंध्रमधील व्यंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे
एकादशीमुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी : रेलिंग तुटल्याने दुर्घटना
व्रतसंस्था/ श्रीकाकुलम
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील काशीबुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात शनिवारी एकादशीच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत दहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ महिला आणि दोन मुले आहेत. तसेच अन्य 25 हून अधिक भाविकांवर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली.
धक्काबुक्कीमुळे रेलिंग तुटल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सरकारने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिकांच्या मते, मंदिरात जाण्यासाठी फक्त एकच रस्ता आहे. आज प्रचंड गर्दी असताना रस्ता बंद झाला. श्रीकाकुलमचे पोलीस अधीक्षक के. व्ही. महेश्वर रेड्डी यांनी घटनेची माहिती देताना मंदिर प्रशासक हरिमुकुंद पांडा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिताच्या कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेंगराचेंगरीनंतर अनेक महिला बेशुद्ध
चेंगराचेंगरीचे अनेक व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये मंदिराच्या पायऱ्यांवर लोकांची मोठी गर्दी दिसत आहे. त्यामध्ये महिला, मुले आणि अनेक वृद्ध लोक होते. रेलिंग कोसळल्यामुळे लोक गर्दीखाली चिरडले गेले. महिला आणि मुले बाहेर पडण्यासाठी ओरडताना दिसत आहेत. तर काहीजण जीव वाचवण्यासाठी लोकांवर पाय ठेवून पुढे जात होते. त्यानंतरच्या व्हिडिओंमध्ये लोक गर्दीत अडकलेल्या महिला आणि मुलांना वाचवताना दिसत आहेत. चेंगराचेंगरीच्या ठिकाणी महिला बेशुद्ध पडलेल्या दिसून येत आहेत. लोक महिलांना हात आणि पाय धरून गर्दीतून बाहेर काढताना दिसले.
येथील वेंकटेश्वरा मंदिरात दर आठवड्याला सुमारे 1,500 ते 2,000 भाविक मंदिरात येतात. तथापि, शनिवारी एकादशीमुळे भाविकांची संख्या लक्षणीयरित्या जास्त होती, असे आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री अनिता यांनी सांगितले. मंदिर पहिल्या मजल्यावर असल्यामुळे त्यावर जाण्यासाठी 20 पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढतानाच धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, आरोग्यमंत्री सत्य प्रकाश यांनी मंदिरात इतकी क्षमता नसली तरी शनिवारी 25,000 हून अधिक लोक दर्शनासाठी आले होते, असे स्पष्ट केले आहे.
Comments are closed.