अमृतसरमध्ये विषारी मद्यपान केल्यानंतर 20 मृत
मुख्य आरोपीसह 7 जणांना अटक : विषारी दारूमुळे तीन जण गंभीर
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात विषारी दारूचे प्राशन केल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर तीन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि अबकारी अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा नोंद करत पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींमध्ये मुख्य आरोपी प्रभजीत सिंह, कुलबीर सिंह, साहिब सिंह, गुरजंत सिंह आणि निंदर कौर सामील आहे. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
मजीठा गावात निर्दोष लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार गुन्हेगारांना मोकळे सोडले जाणार नाही. हे मृत्यू नसून हत्येचा प्रकार आहे. दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाणार असल्याचे उद्गार पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक्सवर पोस्ट करत काढले आहेत.
दिवंगत आत्म्यांना शांतता मिळावी म्हणून प्रार्थना करत आहे. सरकार पीडित परिवारांसोबत असून शक्य ती सर्व प्रकारची मदत केली जाणार आहे. विषारी दारूचे हे बळी भंगाली, पातालपुरी, मरारी कलां आणि थेरेवाल गावांमध्ये गेले आहेत. विषारी दारूच्या निर्मितीसाठी ऑनलाइन स्तरावर मोठ्या प्रमाणात मेथनॉल खरेदी करण्यात आले होते असे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. अमृतसर जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय पथके तैनात केली असल्याची माहिती मान यांनी दिली.
अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी यांनी 20 बळींची पुष्टी देत यातील बहुतांश जण मजूर होते असे सांगितले. वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनिंदर सिंह यांनी प्रभावित गावांचा दौरा करत पीडित परिवारांची भेट घेतली आहे. संबंधित दारूचे प्राशन करणाऱ्या सर्व लोकांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यावर आम्ही जोर देत आहोत असे त्यांनी सांगितले.
Comments are closed.