3 विकेट्स अन् नाबाद 66 धावा! अर्जुन तेंडुलकरचा टी20 मुंबई लीगमध्ये कहर, व्हिडिओ पाहाच

अर्जुन तेंडुलकर टी२० मुंबई लीगमध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. त्याने अष्टपैलू खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. ८ जून रोजी टी२० मुंबई लीगमध्ये वानखेडे स्टेडियमवर वांद्रे ब्लास्टर्स आणि एआरसीएस अंधेरी हे संघ भिडले. अंधेरीकडून खेळणाऱ्या अर्जुनने या सामन्यात प्रथम गोलंदाजीत नंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत जबरदस्त कामगिरी करत सर्वांना चकित केले. त्यानेच या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या वांद्रे ब्लास्टर्सची सुरूवात खराब झाली. त्यांचे पहिले तीन फलंदाज लवकरच तंबूत परतले. अर्जुनने अर्जुनने पहिल्याच षटकात प्रतीक कुमार यादव आणि पराग खानापूरकर यांना बाद केले. त्याने तीन षटकांत तीन विकेट्स् घेतल्या. यादरम्यान त्याने १३ चेंडू निर्धाव टाकले आणि केवळ ११ धावा दिल्या. त्याच्या या भेदक गोलंदाजीच्या प्रभावामुळे वांद्रे ब्लास्टर्सने २० षटकांत ९ विकेट्स गमावत १४४ धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना अंधेरीने चांगली सुरूवात केली, मात्र तिसऱ्याच षटकात सलामीवीर दिव्यांश सक्सेना २६ धावा करत बाद झाला. त्यानंतर अर्जुन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने मुशीर खानसोबत भागीदारी केली. या जोडीने शतकी भागीदारी करून अंधेरीला अवघ्या १३.५ षटकांतच लक्ष्यापर्यंत पोहोचवले.

या सामन्यात अर्जुनने त्याच्या उल्लेखनीय कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. तो ३४ चेंडूंमध्ये चार चौकार आणि पाच षटकारांसह ६६ धावा करत नाबाद राहिला. तसेच मुशीरने ३८ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५४ धावा केल्या. अंधेरीचा या हंगामातील हा तिसरा विजय ठरला. त्यांचे चार सामन्यानंतर सहा गुण झाले आहेत. तसेच प्रभावी कामगिरीमुळे त्यांचा नेट रनरेटही उत्तम आहे. आठ संघांच्या या स्पर्धेत सध्या ते दुसऱ्या स्थानावर आहे. वांद्रे ब्लास्टर्स आठव्या स्थानावर गेले आहेत.

Comments are closed.