Baby Care Tips: थंडीत बाळाला दररोज अंघोळ घालावी का? जाणून घ्या बालरोगतज्ञांचा सल्ला
थंडीच्या दिवसांत लहान बाळांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कारण त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यानं त्यांना लवकर संसर्गाचे आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे या दिवसांत शक्यतो लहान बाळांना उबदार कपडे घालावे. तसेच थंडीत बाळांना अंघोळ घालावी का? हा प्रश्नही अनेक पालकांना पडतो. याबाबत बालरोगतज्ञ काय सल्ला देतात जाणून घेऊया..
बालरोगतज्ञांच्या मते, तुमचं बाळ हे तीन महिन्यांपेक्षा लहान असेल तर त्याला एकदिवसाच्या अंतराने अंघोळ घालावी. एक दिवस कोमट पाण्याने बाळाला स्पंजिंग करावं. याउलट बाळ तीन महिन्यांपेक्षा मोठं असेल तर तुम्ही बाळाला दररोज अंघोळ घालू शकता. मात्र एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे बाळाला अंघोळ घालताना कधीही जास्त गरम पाणी वापरू नये. कारण यामुळे बाळाच्या त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. त्यामुळे बाळाला नेहमी कोमट पाण्याने अंघोळ घालावी. तसेच ७ ते ८ मिनिटांपेक्षा जास्त वेळ अंघोळ घालू नये.
बाळाला अंघोळ घातल्यावर घरातील खिडक्या आणि दारं बंद करावी. यामुळे थंड हवा आत येत नाही आणि बाळाला थंडी वाजत नाही. तसेच थंडीत बाळाला दिवसभर उबदार कपडेच घालावे. अंघोळ घातल्यानंतर बाळाला नेहमी मॉइश्चरायझर लावावं. यामुळे त्यांची त्वचा मऊ राहते.
Comments are closed.