Hair Care: बाजारातले हेअर प्रोडक्ट्स खरंच उपयोगी आहेत का?

आजच्या काळात केसातील कोंडा ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या झाली आहे. बाजारात अनेक प्रकारचे शाम्पू, कंडिशनर आणि तेल उपलब्ध आहेत जे ‘कायमचा कोंडा घालवा’ किंवा ‘केस मऊ आणि निरोगी करा’ असा दावा करतात. पण खरोखरच हे प्रॉडक्ट्स उपयोगी ठरतात का? या प्रश्नावर ‘ओन्ली मानिनी’ला दिलेल्या खास मुलाखतीत डर्मोटॉलॉजिस्ट डॉ. शंकर सावंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (haircare dandruff treatment cosmetic products impact on hair)

डॉ. सावंत सांगतात, “बाजारात मिळणारे बहुतांश हेअर प्रॉडक्ट्स हे कॉस्मेटिक लेव्हलचे असतात. त्यांचा लायसन्सही केवळ कॉस्मेटिक वापरासाठी घेतलेला असतो. त्यामुळे ज्यांना अतिशय सौम्य म्हणजेच थोडासा कोंडा आहे, त्यांच्यासाठी असे शाम्पू चालू शकतात. पण जर कोंडा मध्यम किंवा जास्त प्रमाणात असेल, तर हे प्रॉडक्ट्स उपयोगाचे नसतात.”

त्यांच्या मते, कोंडा हा फक्त सौंदर्याचा प्रश्न नसून काही वेळा त्वचारोगाशी संबंधित असतो. “अनेकदा कोंड्यासोबत खाज, लालसरपणा, त्वचेवर चट्टे दिसतात. अशा वेळी सामान्य शाम्पूने फायदा होत नाही. त्यासाठी सॅलिसिलिक अॅसिड, कोल टार किंवा केटोकोनाझोल असलेले मेडिकेटेड शाम्पू आवश्यक असतात,” असे ते म्हणाले.

डॉ. सावंत पुढे सांगतात, “जर कोंडा सुरुवातीच्या अवस्थेत असेल, तर योग्य उपचारांमुळे तो पूर्ण बरा होऊ शकतो. परंतु, जाहिरातींमध्ये दाखवलेले प्रॉडक्ट्स वापरून वेळ आणि पैसे दोन्ही वाया जाण्याची शक्यता असते. म्हणूनच अशा समस्येत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.”

ते शेवटी सांगतात, “शाम्पूचा मुख्य उद्देश म्हणजे टाळू स्वच्छ ठेवणे. पण जर कोंडा त्वचेच्या रोगामुळे होत असेल, तर त्यावर औषधी उपचारच गरजेचे असतात. योग्य वेळी निदान आणि मेडिकेटेड उपचार घेतल्यास ही समस्या पूर्णपणे बरी होऊ शकते.”

Comments are closed.