Signs Of Toxic Relationship: नात्यातील रेड फ्लॅग्स ओळखायला शिका, वाचा तज्ज्ञांचा इशारा

नातं कोणतंही असो मैत्रीचं, रिलेशनचं किंवा ओळखीचं सुरुवातीला सर्व काही हलकं फुलकं, मोकळं आणि आनंददायी वाटतं. गप्पा, मजा, जुळणारी वाइब्स आणि हळूहळू जवळीक वाढत जाते. पण कधी कधी या गोड मैत्रीत काही वर्तन डोळ्यासमोर येऊ लागतं, जे सुरुवातीला किरकोळ वाटतं, पण पुढे जाऊन मोठी समस्या ठरू शकतं. यालाच लोकं रेड फ्लॅग म्हणतात. (relationship red flags how to identify and handle)

‘ओन्ली मानिनी’ला दिलेल्या मुलाखतीत समुपदेशक तृप्ती जोशी कुलश्रेष्ठ यांनी नात्यातील अशा रेड फ्लॅग्सबद्दल स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या मते पहिला रेड फ्लॅग तेव्हाच दिसतो, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्यावर हलकंसं नियंत्रण ठेवू पाहते. सुरुवातीला आपल्याला ते प्रेमाचा भाग वाटतं. पण प्रत्यक्षात हीच पहिली सिग्नल असते की पुढे हा कंट्रोल वाढू शकतो.

त्या सांगतात की, आपण अनेक वेळा इतक्या भावना गुंतवतो की रेड फ्लॅगही ग्रीन फ्लॅग वाटू लागतात. आणि नंतर पश्चाताप उरतो. त्यामुळे सुरुवातीलाच स्वतःला विचारणं महत्त्वाचं मी चुकीच्या व्यक्तीशी मैत्री तर करत नाही ना?

तृप्ती जोशी कुलश्रेष्ठ म्हणाल्या की, ‘कधी कधी समोरचा सांगतो की मला डॉमिनेट केलं जात आहे. पण संपूर्ण परिस्थिती तशीच असेल असं नाही. आपण स्वतः किती कंट्रोल समोरच्या हातात देतो आहोत, हेही पाहायला हवं.’ उदाहरण देताना त्या म्हणतात, ‘आपणच जर म्हणत असू की मला कळत नाही कोणती नोकरी करायची, तू सांग. मग आपण निर्णयाचा अधिकार देतो. आणि पुढे डोईजड झाल्यावर म्हणतो की मला कंट्रोल केलं जातंय.’

सुरुवातीलाच आपल्या मर्यादा, आपल्या बाउंड्री स्पष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. “मला हा निर्णय मला घ्यायचा आहे”, “हा माझा वेळ आहे”, “हे वागणं मला पटत नाही” असं बोलायला शिकलं की नातं अधिक स्पष्ट होतं.

रेड फ्लॅग दिसला म्हणजे नातं लगेच संपवायचं, अशी गरज नसते. त्यांच्या मते, “लोक रेड फ्लॅगला एवढं का घाबरतात? रेड फ्लॅग खाली उतरवून त्यावर संवाद साधला, तर अनेक प्रश्न सुटू शकतात.” महत्वाचं म्हणजे एकमेकांशी कसं बोलतो, कसं समजावतो, आणि आपली भावना स्पष्ट करतो. नात्यातील रेड फ्लॅग्स ओळखणं म्हणजे नातं तोडणं नव्हे. उलट, स्वतःच्या मर्यादा जाणून नातं अधिक निरोगीपणे टिकवण्याचा प्रयत्न आहे. आणि हे समजलं की चुकीचं कुठे सुरू होतंय, तर भविष्यातील मोठा त्रास टाळता येऊ शकतो.

Comments are closed.