Children Health Safety: सर्दी आजार नाही तर, शरीराची डिफेन्स सिस्टीम

मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे, नव्या इमारती उभ्या राहत आहेत आणि सतत खोदकाम सुरू असल्यामुळे हवेत प्रचंड प्रमाणात धुळकण फिरत राहतात. हे धुळकण प्रत्येक श्वासासोबत आपल्या शरीरात प्रवेश करतात. मोठ्यांनाच नव्हे तर लहान मुलांनाही याचा मोठा त्रास जाणवू लागला आहे. याच विषयावर ‘ओन्ली मनिनी’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. अजय पेंडसे म्हणाले, “आजकाल सर्दी आणि श्वसनाचे त्रास वाढल्याची पालकांची तक्रार खूप आहे. परंतु हे सर्व अचानक वाढलेले नाही, तर हवेत वाढलेल्या धुळीमुळे हे त्रास अधिक जाणवू लागले आहेत.” (cold is not a disease it is body defense mechanism)

नाक वाहणे ही आजाराची लक्षणे नसून शरीराची डिफेन्स सिस्टीम
डॉ. पेंडसे पुढे म्हणाले, “हवेतले धुळकण जेव्हा नाकातून आत जातात तेव्हा सर्वप्रथम नाकातील म्यूकोसल झिल्ली त्यांना इरिटेट करते. या इरिटेशनला प्रतिसाद म्हणून शरीर लगेचच अधिक सिक्रेशन तयार करते आणि नाक वाहू लागते. हे नाक वाहणे म्हणजे शरीराचे त्या धुळकणांना धुवून बाहेर टाकण्याचे प्रयत्न असतात. त्यामुळे नाक वाहणे वाईट नाही, ते शरीराचे नैसर्गिक संरक्षण आहे.”

ते पुढे सांगतात, “नाक वाहणे, शिंका येणे, हलका खोकला येणे ही सर्व ‘शरीराची डिफेन्स मेकॅनिझम’ आहेत. हे प्रकार म्हणजे एखादा आजार नव्हे, तर शरीर स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत असते.”

नाक वाहत असल्यावर लगेच औषध घेण्याची गरज नाही
डॉ. पेंडसे स्पष्ट करतात, “आपल्याकडे नाक वाहताच लगेच औषध देण्याची किंवा घेण्याची घाई केली जाते, परंतु ते आवश्यक नसते. नाक वाहू देणे हेच बरे, कारण त्यामुळे नाकातील धुळकण आणि जंतू बाहेर पडत जातात. हलकी सर्दी किंवा नाक वाहत असल्यास ते शरीर नॅचरलरी व्यवस्थित साफ करते.”

ते पुढे म्हणाले, “मुलांमध्ये तर ही प्रक्रिया अधिक नैसर्गिक असते. त्यामुळे प्रत्येकवेळी औषध देण्यापेक्षा मुलांचे नाक स्वच्छ राहील याची काळजी घेणे, घरातील हवा स्वच्छ ठेवणे आणि धुळीपासून शक्य तितके दूर ठेवणे हे अधिक महत्त्वाचे.”

शहरीकरणामुळे हवेत वाढणारी धूळ ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या झाली आहे. पण सर्दी, नाक वाहणे किंवा खोकला हे अनेकदा आजार नसतात, तर शरीराची डिफेन्स सिस्टीम सक्रिय असल्याचे संकेत असतात. त्यामुळे पालकांनी घाबरून जास्त औषधोपचार करण्याची गरज नाही, उलट शरीराला नैसर्गिकरित्या साफ होऊ देणे अधिक योग्य आहे.

Comments are closed.