Yoga for Mood Swings : ‘ही’ योगासने आहेत मूड स्विंग्स कंट्रोलर

हल्लीच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेकजण मूड स्विंग्सच्या समस्येला सामोरे जात आहेत. कधी अचानक राग येणे, विनाकारण चिडचिड होणे, उदास वाटणे किंवा बेचैनी जाणवणे हे केवळ मानसिक थकव्याचे नव्हे तर शरीरातील असंतुलनाचेही संकेत असू शकतात.

अपुरी झोप, वाढता ताण, हार्मोनल बदल आणि अनियमित दिनचर्या यामुळे मनावर परिणाम होतो. अशावेळी औषधांपेक्षा नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी ठरू शकतात. योग हा त्यापैकीच एक उत्तम पर्याय मानला जातो. नियमित योगासनांमुळे शरीरासोबत मनालाही शांतता मिळते आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत करते.

बालासना
बालासन हे शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स करण्यासाठी अतिशय उपयुक्त आसन आहे. यामुळे मानसिक थकवा कमी होतो आणि ओव्हरथिंकिंगवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर बसा आणि श्वास सोडत पुढे वाका. कपाळ जमिनीला टेकवा आणि हात समोरच्या दिशेने पसरवा. डोळे बंद करून काही वेळ शांत श्वास घ्या. काही मिनिटांतच मन हलके वाटू लागते.

सेतू बंधनासन
सेतु बंधासन हे हार्मोनल संतुलन राखण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी प्रभावी मानले जाते. यामुळे शरीरातील थकवा कमी होतो आणि मन अधिक स्थिर राहते. हे आसन करण्यासाठी पाठीवर झोपा, गुडघे वाका आणि पाय जमिनीवर ठेवा. श्वास घेत कंबर वर उचला आणि काही सेकंद ही स्थिती कायम ठेवा. त्यानंतर हळूहळू खाली या.

भुजंगासन
लो मूड आणि नैराश्य दूर करण्यासाठी भुजंगासन फायदेशीर ठरते. हे आसन शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते. हे करण्यासाठी पोटावर झोपा आणि हात खांद्याजवळ ठेवा. श्वास घेत छाती वर उचला आणि काही सेकंद स्थिती कायम ठेवा. त्यानंतर हळूहळू पूर्वस्थितीत या.

शवासन
दिवसभराच्या धावपळीनंतर मन आणि शरीर पूर्णपणे रिलॅक्स करण्यासाठी शवासन अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे नकारात्मक विचार कमी होतात आणि मन शांत राहते. हे आसन करताना पाठीवर सरळ झोपा, हात-पाय सैल सोडा आणि डोळे बंद करा. शांतपणे श्वासावर लक्ष केंद्रित करा.

सुखासन
सुखासन हे ध्यानासाठी आणि मानसिक शांततेसाठी उत्तम आसन मानले जाते. यामुळे तणाव आणि चिंता कमी होऊन भावनिक संतुलन राखण्यास मदत होते. हे करण्यासाठी पद्मासनासारखे बसा, पाठ सरळ ठेवा आणि डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. काही मिनिटांत मन शांत होऊ लागते.

वज्रासन
वज्रासन हे एकमेव असे आसन आहे जे जेवणानंतरही करता येते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मन अधिक स्थिर राहण्यास मदत होते. हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर बसून टाचांवर बसा आणि पाठ सरळ ठेवा. सामान्य श्वास घेत काही मिनिटे या स्थितीत राहा.

योगासनाचे महत्त्व
योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून मन आणि शरीर यांच्यातील संतुलन साधण्याचा प्रभावी मार्ग आहे. नियमित योगा केल्याने मूड स्विंग्स कमी होण्यास मदत होते आणि मन अधिक सकारात्मक राहते.

Comments are closed.