शिवलिंगचे 'वॉटरिंग'

मध्यप्रदेशातील जबलपूर येथे सध्या एक ‘चमत्कार’ पहावयास मिळत आहे. जबलपूरमधील गोरखपूर महादेव मंदिरात तो घडत आहे. या मंदिरात प्राचीन शिवलिंग आहे. त्याच्यावर जलाभिषेक केला की हे शिवलिंग अभिषेकाच्या साऱ्या जलाचे ‘प्राशन’ करते, असा अनुभव लोकांना येत आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी दूध पिणाऱ्या गणपतीचा चमत्कार घडला होता. त्याची आठवण करुन देणारी ही घटना आहे. त्यावेळी जशी भगवान गणपतीच्या प्रत्येक मंदिरासमोर दूध पिणारा गणपती बघण्यासाठी भक्तांची रांग लागत होती, तशी या शिवमंदिरात लागताना दिसते.

या शिवलिंगाचा आणखी एक चमत्कार समोर आला आहे. या शिवलिंगावर कोणतीही अक्षरे रेखाटली की ती काही सेकदांमध्ये अपोआप नाहीशी होताना दिसत आहेत. एका भक्ताने शिवलिंगावर गंधाने ॐ चे रेखाटन केले. काही क्षणातच ते नाहीसे झाले. ही घटना काही पत्रकारांनी प्रत्यक्ष पाहिली असून त्यांनी ते वृत्त आपल्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धही केले आहे. त्यानंतरच या ‘चमत्कारा’ची माहिती झपाट्याने सर्वत्र पसरली आहे. असे घडण्यामध्ये खरोखरच दैवी चमत्कार आहे, की काही वैज्ञानिक कारण आहे, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. तथापि, या घडण्याला प्रसिद्धी मात्र प्रचंड लाभली असून या परिसरात ज्याच्या त्याच्या तोंडी या ‘चमत्कारा’चीच चर्चा असल्याचे पहावयास मिळत आहे.

बऱ्याच वर्षांपूर्वी गणपतीच्या दूध पिण्याचा चमत्कार घडला होता, तेव्हा त्यालाही काही दिवस अशीच प्रसिद्धी मिळाली होती. तथापि, नंतर त्यामागचे वैज्ञानिक कारण स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्या चमत्काराची चर्चा थांबली होती. आता या शिवलिंगाच्या जलप्राशनासंबंधी काय घडते ते पहावे लागणार आहे, असेही मत व्यक्त होत आहे. हे शिवलिंग ज्या दगडापासून बनविण्यात आले आहे, त्यात जल शोषून घेण्याची क्षमता असावी, असे एक कारण दिले जात आहे. तथापि, हा दैवी चमत्कारच आहे, अशी या मंदिराच्या परिसरातील भाविकांची श्रद्धा आहे. शिवलिंगावर अभिषेक केलेले जल इतरत्र कोठे किंवा शिवलिंगाच्या खाली सांडतानाही दिसत नाही. त्यामुळे भाविकांचा अधिकच विश्वास बसत आहे. अर्थातच, या घटनेचे खरे कारण स्पष्ट होईपर्यंत ही चर्चा होतच राहणार आहे.

Comments are closed.