डिजिटल अटक प्रकरणात आरोपीला 7 वर्षांची शिक्षा सुनावली गेली

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून महिला डॉक्टरची 85 लाखांची फसवणूक

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच डिजिटल अरेस्टच्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका महिला डॉक्टरला डिजिटल अरेस्ट करून तिची 85 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी देवाशिष राय याला लखनौच्या सीजेएम न्यायालयाने 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सीजेएम न्यायालयाने आरोपीला कलम 419, 420, 467/468/471 आणि आयटी कायद्याच्या कलम 66ड अंतर्गत दोषी ठरवत 50,000 रुपये दंडही ठोठावला. एका वर्षात खटला पूर्ण झाल्यानंतर आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

देवाशिष रायने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून महिला डॉक्टरला फोन करून धमकी देत लाखोंची रक्कम हडप केली होती. महिला डॉक्टरला 10 दिवस व्हिडिओ कॉलवर डिजिटल अटकेत ठेवत तिच्याकडून 85 लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेण्यात आले होते. पीडिता डॉ. सौम्या गुप्ता यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी लखनौच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लखनौ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आझमगड येथील रहिवासी असलेल्या आरोपी देवाशिष राय याला पाच दिवसांत लखनौ येथून अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने बनावट आयडीवर बँक खाते उघडून फसवणुकीची कबुली दिली होती.

Comments are closed.