बिहारच्या निवडणुकीची रणशिंग उडविली गेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक प्रकल्पांचे उद्घाटन, नवा बिहार घडविण्याचा दिला नारा

वृत्तसंस्था / पाटणा, मोतीहारी

‘बनाएंगे नया बिहार, फिर एक बार रालोआ सरकार’ असा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीचे जणू रणशिंगच फुंकले आहे. शुक्रवारी त्यांनी या राज्याचा दौरा केला. राज्यातील अनेक जिल्हे आज धान्योत्पादनाच्या संदर्भात मागे आहेत. आमच्या पुढच्या कार्यकाळात आम्ही या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करुन बिहारची सर्वांगिण उन्नती घडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी मोतीहारी येथील जाहीर सभेत केले.

आपल्या भाषणात त्यांनी लालू प्रसाद यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस तसेच डाव्या पक्षांवर जोरदार टीकेचे आसूड ओढले. या पक्षांनी केवळ एका परिवाराला मोठे करण्याचे काम केले. त्यासाठी त्यांनी राजसत्तेचा दुरुपयोग केला. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या गेल्या 16 वर्षांच्या काळात बिहारला विकासाची खरी दिशा सापडली. जनतेने आम्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्याची संधी दिल्यानंतर आम्ही याच दिशेने बिहारचा विकास घडवून नवा बिहार घडविणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माओवादाचा अंत जवळ

गोरगरीब आणि आदीवासी जनतेला वेठीस धरुन आपला स्वार्थ जनतेच्या नावाने साधणारा माओवाद आज आपले अंतिम श्वास घेत आहे. त्याचा शेवट जवळ आला आहे. रालोआशासित राज्यांमध्ये आम्ही माओवादाची पाळेमुळे उखडण्यासाठी निर्णायक अभियान हाती घेतले असून ते यशस्वी होण्याचा मार्गावर आहे. माओवादाची दहशत आता थांबणार आहे, असा घणाघात त्यांनी केला.

हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी 7 हजार 217 कोटी रुपयांच्या अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. हे प्रकल्प प्रामुख्याने रेल्वे आणि मार्गनिर्मितीशी संबंधित आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या काळात बिहारमध्ये पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाशिवाय राज्याची परिपूर्ण प्रगती शक्य नसल्याचे प्रतिपादनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

सर्वांना देणार विनामूल्य वीज

याच जुलै महिन्यापासून बिहारमध्ये सर्व घरांना 125 युनिटस्पर्यंत विनामूल्य वीजेचा लाभ होणार आहे. 2005 पर्यंत राज्यात वीजेची मोठ्या प्रमाणात टंचाई होती. मात्र, रालोआच्या सत्ताकाळात आम्ही वीजेचे उत्पादन बरेच वाढविले. आज बिहारमध्ये वीजेचा तुटवडा नाही. म्हणूनच विनामूल्य वीजेची योजना आणली आहे, अशी मांडणी याच सभेत राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली.

रोडशोला मोठा प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह जाहीरसभेआधी मोठ्या रोडशोमध्ये भाग घेतला. या रोडशोला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बिहारमध्ये येत्या नोव्हेंबरच्या उत्तरार्धात विधानसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्वाचा ठरत आहे.

तृणमूलला हटवा, पश्चिम बंगाल वाचवा…

बिहारच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारलाच लागून असलेल्या पश्चिम बंगाल राज्यालाही भेट दिली. दुर्गापूर येथे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. पश्चिम बंगाल ही थोर व्यक्तीमत्वांची भूमी आहे. पण सध्या तृणमूल काँग्रेसच्या राज्यात या राज्याला अवकळा प्राप्त झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्षाला सेवा करण्याची संधी द्यावी. तृणमूल काँग्रेसला हटविल्याशिवाय या राज्याला चांगले दिवस दिसणे अशक्य आहे. तृणमूल काँग्रेस गुन्हेगारी, गुंडगिरी आणि भयवादाला प्रोत्साहन देत आहे. राज्यातील जनता, विशेषत: महिला यामुळे भयभीत अवस्थेत जीवन जगत आहेत. महिलांच्या सुरक्षेची स्थिती दयनीय आहे. ही दु:स्थिती जाण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पश्चिम बंगालमध्ये प्रकल्पांची घोषणा

या राज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 हजार 400 कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पांची घोषणा केली. बांकुरा आणि पुरुलिया जिल्ह्यांसाठी त्यांनी भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या वायूवितरण प्रकल्पाचे उद्घाटन केले. दुर्गापूर-कोलकाता अशा 132 किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचा शुभारंभ त्यांनी केला. जगदीशपूर-हल्दिया आणि बोकारो-धामरा या महत्वाकांक्षी गॅस पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटनही त्यांनी केले. दुर्गापूर स्टील थर्मल पॉवर केंद्राच्या एफजीडी प्रकल्पाचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

दोन राज्यांचा दौरा

ड बिहारप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला पश्चिम बंगालचाही दौरा

ड दोन्ही राज्यांसाठी हजारो कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पांचा केला शुभारंभ

ड युवकांना रोजगार हा केंद्र सरकारच्या प्राधान्याचा विषय असे प्रतिपादन

ड युवकांवर अन्यत्र रोजगार मिळविण्याची वेळ येऊ न देण्याचे दिले आश्वासन

 

Comments are closed.