Eye Flu: पावसाळ्यात आय फ्लूचा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

पावसाळ्यात अनेक संसर्गाचा धोका वाढतो. कारण बहुतांश जीवाणू या ऋतूत फुलतात. सर्दी, खोकला याप्रमाणेच पावसाळ्यात आय फ्लूचे प्रमाणही वाढते. पावसाळ्यात अनेकदा आपल्या डोळ्यांना संसर्गाचा धोका असतो. यामुळे डोळे लालसर होतात, डोळ्यांना खाज सुटते. यामुळे आपल्याला चीड चीड होऊ शकते. त्यामुळे आय फ्लूची लक्षणे काय? आय फ्लू झाल्यावर काय काळजी घ्यावी? याबाबत जाणून घेऊया..

पावसामुळे हवामानात झपाट्याने बदल होत आहे. या हंगामात आर्द्रतेमुळे बुरशीजन्य संसर्गाची समस्या उद्भवते. त्यामुळे डोळ्यांना देखील संसर्ग होऊ शकतो. तसेच पावसाच्या पाण्यामुळेही कधीकधी संसर्ग होऊ शकतो.

आय फ्लूची लक्षणे काय?

आय फ्लूचे सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे डोळे लाल होतात. डोळ्यात जळजळ होते. डोळ्यांमधून पाणी येते आणि खाज सुटते. या समस्येच्या सुरुवातीला पापण्यांवर पिवळे आणि चिकट द्रव जमा होऊ लागते. डोळ्यात एक विचित्र प्रकारचा डंख आणि सूज येते. तसेच जर संसर्ग खोलवर झाला तर डोळ्यांच्या कॉर्नियालाही इजा होऊ शकते. ही लक्षणे दिसल्यास तुम्हाला आय फ्लू झालेला असू शकतो. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. डॉक्टर रुग्णाची स्थिती आणि लक्षणांवर आधारित औषधे वापरण्याची शिफारस करतात.

आय फ्लू झाल्यावर हे टाळा

आय फ्लू झाल्यावर डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. हे सामान्य दिसत असले तर पुढे याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आय फ्लू झाल्यास डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे टाळा. स्वच्छ पाण्याने डोळे धुत रहा. तसेच एखाद्या सुती कापडाने डोळे अलगद पुसा. टीव्ही किंवा मोबाइलच्या स्क्रीनपासून दूर राहा.

घरगुती उपाय:

गुलाबाचे पाणी:

यावर काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता. या उपायांमुळे तुम्हाला आराम वाटेल. गुलाब पाण्याने डोळ्यांना आराम मिळतो. यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण आहे. ज्यामुळे डोळे साफ होतात आणि चिकटपणा देखील दूर होतो. यामुळे गुलाब पाण्याचे काही थेंब डोळ्यात टाका. यामुळे जळजळ कमी होईल.

बटाटा:

आय फ्लूमुळे जर डोळ्यांमध्ये खाज येत असेल तर बटाट्याचा वापर करू शकता. बटाट्याचे पातळ तुकडे कापून डोळ्यांवर ठेवा. यामुळे सूज तर कमी होईलच पण खाज आणि चिकटपणा देखील कमी होतो.

थंड पाणी:

डोळ्यांवर अलगद बर्फाचे पाणी लावा. यामुळे जळजळ कमी होईल. डोळ्यांना थंड वाटेल. फक्त डोळे चोळू नका. नाही तर सूज वाढू शकते.

Comments are closed.