परीक्षण – वर्तमानाचा उभा आडवा आलेख
>> चिनोथ सहाय्य
चिंबोरे याचा अर्थ समुद्रखाडीतला खेकडा आणि चिंबोरेचे रूपकात्म युद्ध म्हणजे चिंबोरे युद्ध! लेखक बाळासाहेब लबडे यांची ही चौथी कादंबरी. ही एक आगळीवेगळी कादंबरी आहे. स्वतःचा शोध, त्याचा आदिबंधात्मक निपटारा तसेच आदिम संवेदनेतून तर थेट आर्टिफिशल इंटेलिजन्सपर्यंतचा प्रवास जणू माणसाचे जगणे ते चिंबोरी मॅन या व्यक्तित्वापासून सहजपणे समजत जाते.
साधारणपणे कादंबरीतील सर्व घटना, आवाका आणि त्यातील व्यक्त होणाऱया व्यक्तिरेखा या सर्वांनाच साम्राज्यशाहीचे वेड लागलं आहे. तो समूहानं जरी एकत्र येत राहिला तरी तो सातत्याने हल्ला करीत आहे ते समोरच्या वर आणि त्याहीपेक्षा विश्वासाचा स्फोट करणाऱया मनोवृत्तीवर चिंबोरी मॅन हे सारं काही पाहत आहे. यात खेकडय़ाची रूपकात्मकता क्षणोक्षणी वाचकाला अधिकाधिक कादंबरीचे वाचन करण्यास प्रवृत्त करते. त्याची महत्त्वाची दोन कारणे आहेत. एकतर माणसाला असणारा बुद्धीचा अट्टाहास आणि दुसरे म्हणजे जगच आता ज्या उंबरठय़ावर उभे आहे, त्याची शब्दोशब्दी जाणीव होत राहणे. वाचकास या गोष्टी खूपच आवडतात. कारण या मनोविश्लेषणात्मक युद्धात तोदेखील होरपळून निघत आहे.
बाळासाहेब लबडे हे ‘चिंबोरे युद्ध’ कादंबरीच्या प्रारंभीच स्वतःच उद्घोषणा करतात. तेथूनच खरा त्यांच्या कलाकृतीविषयक भूमिकादेखील स्पष्ट होतात. ते लिहितात, “मी लाल्या चिंबोर. माझ्या मागच्या वेळेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. मी खाडीत आलो तेव्हा ती नजरेत भरली. सापासारखी नागमोडी वळणे घेत ती लांबपर्यंत गेली आहे. तिचा चंद्राकृती आकार तिच्याविषयी भूल निर्माण करतो. तिच्या मुखाशी सागराच्या लाटाच लाटा फुटत आहेत.
किनाऱयावर फेसाळत आहेत. लाटा फुटतात, गाज लांबवर आसमंतात पोहोचते आहे. होडय़ा खाडीकिनारी चिडीचूप पडल्या आहेत.’’
हे सारे वर्णन काव्यात्म तर आहेच, परंतु त्यातील तत्त्वाचा भाग मोठा आहे. जन्मतः जणू लाल्या चिंबोरचा नवीन वास्तव घेऊन समोर येत आहे आणि भोवतालची शांतता उद्याच्या भविष्याची युद्धपूर्व स्थिती आहे. असे कितीतरी प्रसंग त्याची समाजातील शब्दांची सरमिसळ तसेच एकूण जगण्याचे काहूर लाल्या चिंबोर शब्दांच्या ध्वस्ततेतून उभे करू पाहत आहे. कादंबरीत पुढे पुढे तर काही शब्द कवितेसारखे पुनःपुन्हा येतात, हे केवळ लिहिणे नव्हे तर आपल्या जगण्यातला सारा दंभच जणू आभाळभर फाटून खाली उतरतो आहे. त्यामुळे कादंबरी ही वर्तमानाची केवळ लिखित शोककथा नव्हे, तर हे सारे काही निरंतर चालणारे सत्य आहे असे सुचविले जाते.
या कादंबरीतील शोषण, हलगर्जीपणा, प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि त्याही पलीकडे ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती पुनः पुन्हा चित्रित होत आहे, नव्हे ते दररोजचे वास्तव आहे. चिंबोरे युद्ध’ यामध्ये समोरासमोरचे युद्ध कोठेही नसते. आज जगभर जणू एकूण मानवी मन अनेकविध समस्यांनी स्वतःला बंदिस्त करू पाहत आहे. सुरक्षितता त्यास हवी आहे. त्यासाठी पुन्हा तो काहीही करू इच्छित आहे. हे दुष्टचक्र केव्हा थांबणार की ही अव्याहत चालणारी नवीन नीती संकल्पना पुन्हा धरू लागली आहे. संपूर्णतः अनियंत्रित असणे हे मानसिक अभिव्यक्तीचे वैशिष्टय़ आहे. तसे पाहिले तर एकूणच दुःखाचे विन्मुखपण ही भयतेची नांदी असते. त्याच वेळी लढा किंवा कृती जागृत होणे गरजेचे असते. अशा वेळी ती भावनांची अभिव्यक्ती असते आणि त्या वेदना, करुणामयी जागृतीच्या स्तरावर एक प्रकारचे परिवर्तन घडते. जेव्हा आपला अनुभव हा जाणिवेत रूपांतरित होतो तेव्हा ‘चिंबोरे युद्ध’ सारखी कादंबरी प्रकट होते.
‘चिंबोरे युद्ध’ ही कादंबरी वाचताना प्रथमतः माझ्या मनामध्ये अभिव्यक्तीरूप गर्भित भाव दिसतो. अर्थ समजून घेण्यासाठी वाचक हा कलावंताच्या अनुभवाची पुनर्बांधणी करू लागतो. हे सर्व नवनिर्मिती,सृजनाचा नवा साक्षात्कार असतो. हे वाचक-लेखन संवेदन पुनः पुन्हा माणसास ‘चिंबोरे युद्ध’सारख्या लेखनकृती वाचण्यासाठी प्रवृत्त करतात.एकंदरीत वर्तमानाचा उभा आडवा आलेख ‘चिंबोरे युद्ध’ रेखाटण्यात कमालीची यशस्वी झाली आहे असे म्हणता येईल.
चिम्बोर युद्ध
लेखक ः बाळासाहेब लबडे
प्रकाशक ः अथर्व पब्लिकेशन, जळगाव
पृष्ठे ः 248
किंमत ः रु.450
Comments are closed.