ईव्हीएम पडताळणीत फक्त एकूण मतदान दाखवून मशीन केल्या बंद, निवडणूक आयोगाची लपवाछपवी सुरूच

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाबाबत निवडणूक आयोगाकडून लपवाछपवी सुरूच आहे. उमेदवारांच्या आक्षेपानंतर सुरू करण्यात आलेल्या ईव्हीएम पडताळणीत कुणाला किती मतदान झाले हे न दाखवता फक्त एकूण मतदान किती झाले हे दाखवून मशीन बंद केल्या जात आहेत. शिवसेना उमेदवार राजन विचारे यांच्या मतदारसंघातील एका केंद्रावर मतदान यंत्र चार वेळा ऑपरेट झाल्याचे आढळून आले आहे. चौथ्यावेळी मशीन कुणी सुरू केले, असा प्रश्न निर्माण झाला असून काहीतरी गडबड असण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील बहुतांश पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्राच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदविले आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची फेरपडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रो कंट्रोलर याची तपासणी व पडताळणी महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांत करण्यात येणार आहे. त्यामध्ये आज ठाणे व यवतमाळ जिह्यांत फेरतपासणी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली.

ठाणे जिह्यातील कोपरी-पाचपाखाडी व ठाणे शहर या दोन मतदारसंघांतील फेरतपासणी तुर्भे स्टोअर, नवी मुंबई येथे घेण्यात आली, मात्र यामध्ये ज्या मतदान केंद्रावरील बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटसंदर्भात उमेदवारांना शंका आहे त्याबाबत कोणतीही पडताळणी न करता केवळ एकूण किती मतदान झाले याची आकडेवारी दाखवून उमेदवार व उमेदवार प्रतिनिधींची बोळवण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज द्या

ठाणे मतदारसंघातील 68 नंबर मतदान केंद्राच्या ईव्हीएम पडताळणी प्रक्रियेमध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी व सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे. तसेच आजचा तपासणीचा अहवाल आम्हाला देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी निवडणूक अधिकाऱयांकडे केली आहे.

मतदान यंत्रात आधीपासूनच बॅटरी

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निकालानंतर मतदान यंत्राची बॅटरी काढण्यात येते, परंतु पडताळणीदरम्यान मतदान यंत्रात आधीपासूनच बॅटरी असल्याचे आढळून आले आहे.

ज्या मतदान केंद्रावरून शिवसेनेचे राजन विचारे यांना अधिक मतदान मिळण्याची अपेक्षा होती त्याच मशीनच्या प्रक्रियेमध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे.

मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मतदान यंत्र तीन सेशनमध्ये चालू असल्याचे दिसायला पाहिजे, मात्र ईव्हीएम पडताळणीदरम्यान ते चार सेशनमध्ये चालू असल्याचे निदर्शनास आले आहे.

Comments are closed.