मधमाश्या पासून 'गोल्ड'
ज्याच्याकडे कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता आहे, तो टाकावू मानल्या गेलेल्या पदार्थांपासूनही उपयुक्त वस्तू निर्माण करु शकतो, असे अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असे संतवचन आहेच. मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात काही कल्पक लोकांनी मधाच्या पोवळ्याच्या टाकावू भागापासून उत्तर गुणवत्तेचे मेण बनविण्याचे तंत्रज्ञान साध्या देशी उपयांच्या साहाय्याने विकसीत केले आहे. त्यामुळे या लोकांना कमी भांडवलात अधिक नफा देणारा एक व्यवसाय गवसला असून त्यांचा भरपूर लाभ यामुळे होत आहे.
असेच एक कल्पक ग्रामस्थ आहेत, किशोर करोडी. वनांमधून मधाची पोवळी उतरवून त्यांच्यातून मध गाळण्याचा त्यांचा व्यवसाय होता. पोवळ्यातून मध काढल्यानंतर उरलेला भाग टाकून दिला जातो. तथापि, या भागापासूनही उत्तम प्रकारचे मेण बनविले जाऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घराच्या घरी असे मेण उत्पादित करण्याचे तंत्रज्ञान देशी साधनांचा उपयोग करुन विकसीत केले आहे. असे मेण 500 ते 600 रुपये किलो या भावाने विकले जाते. या मेणाचे अनेक उपयोग आहेत. त्याच्यापासून ओठांना लावण्याची लीपस्टीक, चेहऱ्यावर लावण्याचे क्रीम, इतकेच नव्हे, तर यंत्रसामग्रीचा स्क्रीन बनविण्यासाठी आवश्यक असणारी उत्पादनेही बनविता येतात. करोडी प्रतिदिन चार ते पाच किलो मेण सध्या उत्पादित करीत आहेत. व्यापारी स्वत: येऊन त्यांच्याकडून ते खरेदी करतात. भविष्यकाळात या व्यवसायाची वृद्धी करण्याची त्यांची योजना आहे.
करोडी यांच्याप्रमाणे बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील अनेक लोक आता हा व्यवसाय करु लागले आहेत. पोवळ्यातून मध काढून झाल्यानंतर उरलेल्या भागावर प्रक्रिया करुन हे मेण मिळविले जाते. या प्रक्रियेला खर्च कमी येतो. तथापि, यासाठी शारिरीक श्रम अधिक करावे लागतात. मात्र, लाभाचे प्रमाणही अधिक असल्याने हा व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्या समाधानकारक आहे, असा या नवउद्योजकांचा अनुभव असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट केले जाते.
Comments are closed.