साय-फाय – इंटरनेट आणि महिला सुरक्षा

>> ऑफर ताम्हनकर
बंगळुरू पोलिसांनी नुकतीच गुरदीप सिंह नामक एका तरुणाला अटक केली आहे. महिलांच्या परवानगीशिवाय त्यांचे सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ काढणे आणि ते इंटरनेटवर अपलोड करणे अशा आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भातील संपूर्ण घटना जेव्हा उघड झाली, तेव्हा गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणीदेखील महिला किती असुरक्षित आहेत हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. यासंदर्भातील कायदे आणि महिलांची सुरक्षा यासंदर्भात समाजातील अनेक लोक पुढे येऊन आता आवाज उठवत आहेत.
बंगळुरूमध्ये शिकत असलेल्या एका तरुणीला इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अचानक अश्लील मेसेज येऊ लागले. अनेक अनोळखी लोक तिला मेसेज करून विचित्र बोलू लागले. या सगळ्याने ती तरुणी एकदम हादरून गेली. तिने खोलात जाऊन तपास केला असता, ती शहरातील चर्च स्ट्रीट या भागात आपल्या दोस्तांबरोबर फिरत असताना तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून गुरदीप सिंह या व्यक्तीने तो इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याचे तिला दिसले. तिने आणि इतर अनेकांनी या व्हिडीओसंदर्भात तक्रार दाखल केली. मात्र सदर व्हिडीओ हा कम्युनिटी गाइडलाइन्सला धरून असल्याचे सांगत तिची मागणी फेटाळली गेली.
या बिचाऱ्या तरुणीला कम्युनिटी गाइडलाइन्स काय असतात, त्यासंदर्भात काय नियम आहेत हेदेखील माहिती नव्हते. शेवटी या तरुणीने एक व्हिडीओ बनवून तिच्या सोबत घडत असलेल्या प्रकाराची माहिती लोकांना दिली आणि पोलीस तसेच सायबर पोलिसांना त्यात टॅग करून मदतीची मागणी केली. या व्हिडीओची जोरदार चर्चा चालू झाल्यावर पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत आरोपी तरुणाला तातडीने अटक केली. त्याच्या चौकशीत सदर तरुण महिलांच्या नकळत चर्च स्ट्रीट आणि कोरमंगल भागात त्यांचा पाठलाग करून त्यांचे व्हिडीओ बनवत असल्याचे व ते इन्स्टाग्रामवर अपलोड करत असल्याचे उघड झाले आहे.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न यानंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. गुरदीप सिंह हा काही अशा प्रकारचा पहिला गुन्हेगार नाही. मेट्रोमधील महिलांचे त्यांच्या नकळत काढलेले व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित कंपनीच्या अकाऊंटटलादेखील अटक केली होती. पोलिसांनी या दोन्ही प्रकारांत भारतीय दंड संहितेच्या कलम 77 व 78 (पाठलाग करणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे. कलम 67 हे इंटरनेटच्या माध्यमातून अश्लील साहित्य प्रकाशित करणे अथवा प्रसारित करणे यासाठी लावले जाते.
या दोन्ही प्रकरणांच्या नंतर यासंदर्भातील कायदा किती तोकडा आहे यावर मोठय़ा प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. कायद्यानुसार अशा आरोपींना पहिल्या अपराधासाठी फार तर 1 ते 3 वर्षांची शिक्षा मिळते. अशा प्रकारच्या घटनांकडे महिलांवरील हिंसा म्हणून पाहायला पाहिजे. मात्र यंत्रणा अशा घटना गांभीर्याने घेत नाही असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. एखाद्या महिलेचा तिच्या परवानगीशिवाय व्हिडीओ बनवणे अथवा फोटो काढणे हे मानसिक छळ मानायला हवे. मात्र आपल्याकडे मानसिक छळ अथवा तत्सम गुह्याची व्याख्या स्पष्ट नाही आणि कडक कायदादेखील नाही अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
अशा प्रकारच्या फोटो आणि व्हिडीओंना डार्कवेबवर प्रचंड मागणी असते. हजारो, लाखो रुपयांत असे साहित्य तिथे विकले जाते. पोलिसांनी या प्रकरणाचा डार्कवेबशी काही संबंध आहे का ते तपासावे अशी मागणीदेखील करण्यात येत आहे. मात्र सध्या तरी पोलीस तपासात असे संबंध उघडकीला आलेले नाहीत. पोलिसांनी यासंदर्भात केलेल्या त्वरित कारवाईचेदेखील अनेकांनी कौतुक केले आहे.
Comments are closed.