साहित्य जगत – असेही जागरण
>> रवीप्रकाश कुलकर्णी
लग्नादी कार्यानंतर देवादिकांची अखंड कृपादृष्टी रहावी म्हणून गोंधळ वा जागरण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. असं जागरण करणाऱया समाजात एका कुटुंबाने हलाखीची परिस्थिती असतानासुद्धा मुलांवर शिक्षणाचा संस्कार केला. अशा संस्कारशील वातावरणामुळे कुटुंबातील मुलाला वेगवेगळे प्रश्न पडू लागले. त्यातलाच एक प्रश्न. तो म्हणतो, “बुडालेली घागर काढाया तो रामलिंग सर्वांना आवडायचा, पण त्या आडाचे पाणी मात्र शेंदून त्याच्या घरी घेऊन जायला मनाई होती, असे का?’’
हा मुलगा पुढे शैक्षणिक, सामाजिक कार्यात भ्रष्टाचाराविरुद्ध विविध पातळ्यांवर कायम लढत राहिला, असा लेखक, कवी आणि सच्चा कार्यकर्ता. त्यामुळे त्याला शिक्षण क्षेत्रातला ‘सिंघम’ असं म्हटलं जाऊ लागलं असा लढवय्या, ज्याचं नाव भारत सातपुते!
शिक्षणाच्या बाबतीत ते म्हणतात,“मला अनेक वर्षांपासून व्यक्तिश शिक्षण खात्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न जाणवतो तो विद्यार्थ्यांच्या पायाभूत ज्ञानाचा आहे. विद्यार्थी दहावीला येतात अन् त्यांना चौथी, पाचवीची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार येत नाही. हिंदी, इंग्रजीचे जाऊ द्या, पण साधे मराठीचे पुस्तक वाचता येत नाही. एखाद्या विषयावर पाच वाक्ये बोलता येत नाहीत. हे विद्यार्थी दहावीला कसे येतात?’’
त्याच्याही पुढचं सत्य सातपुते सर सांगतात, “नव्हे, एक पालक त्यांना सांगतात, खासगी शाळेत घालतो. तिथे काय, अशीच नववी निघते अन् दहावीला तर काय?’’
“काय?’’
“पास करायचे गुत्ते द्यायचे.’’
ही झाली विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणाची दिशा आणि दशा.
पण एका क्षणी त्यांना वाटलं, शिक्षकांच्या पायाभूत शिक्षणाचं काय? शिक्षकांचीदेखील दारुण आणि करुण परिस्थिती. अशा वेळी त्या विद्यार्थ्यांचे काय होणार? पण त्याचे कोणाला काहीच वाटत नाही ही भारत सातपुते यांची खंत आहे. सातपुते नैतिकता केवळ दुसऱयांनी पाळायची याबाबतीत दक्ष आहेत असं नाही, तर त्याला तेसुद्धा अपवाद होत नाहीत. त्याचं एक उदाहरण पहा. साताऱयाला बी.ई. करत असलेल्या त्यांच्या मुलीला उत्पन्नाचे सर्टिफिकेट हवे होते. त्यांनी पाठवून दिले.
तिथल्या लिपिकाचा फोन आला, “अहो सर, केवळ दहा हजारांनी उत्पन्न कमी करून प्रमाणपत्र बदलून द्या म्हणजे तिला फी भरावी लागणार नाही. नाहीतर 56 हजार तुम्हाला जादा भरावे लागतील.’’
सातपुते सरच मुख्याध्यापक असल्यामुळे असे प्रमाणपत्र देणे सहज शक्य होते, पण त्यांनी तसे केले नाही. जादा पैसे भरले. “चालू द्या, नैतिकता बघत असते. ही नाही पाळल्यास आपल्याला आपले मन खाते!’’ इती सातपुते.
भारत सातपुते या माणसाची मूस अशा दुर्मिळ पंचमहाभूतांनी घडली आहे हेच खरे. भारत सातपुते हे लेखक आहेत, फर्डे वत्ते आहेत, कवी आहेत. त्यांची पन्नास-साठ पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
एकदा त्यांच्या अधिकाऱयाने त्यांना विचारलं, “साहित्यासाठीचा निधी तालुक्यांना दिला? त्यांनी साहित्य चांगले घेतले ना?’’
“हो सर!”
“बरे, एक सांगा, पुस्तक खरेदी झाली. त्यामध्ये तुम्ही लिहिलेली किती पुस्तकं आहेत?’’
“एकही नाही सर.’’
“ऑफ? ''
“हा भ्रष्टाचार नाही, पण पदाचा गैरवापर झाला असता.’’
अशा या माणसाला पदोपदी अडवलं गेलं. अगदी निवृत्तीनंतर मिळणाऱया लाभासाठीदेखील, पण हा माणूस हरला नाही. ‘जागरण’ या आत्मकथनात त्याने ही कहाणी खुलेआम सांगितली आहे. भारत सातपुते या माणसाची दखलच घ्यायची तर ‘अपवाद’ अशीच घ्यावी लागेल, पण त्याच वेळी घरच्यांचादेखील त्यांना अव्यक्त पाठिंबा असणार म्हणून शक्य झाले असणार. भारत यांनी त्यांची बायपास झाल्यानंतर एकेकाचे हिशेब पुरे करत आणले. आपल्या पत्नीला ते म्हणाले, “तुला सोन्याचा एखादा दागिना घ्यायचा का?’’
“नको, काय करायचंय!’’
“दुसरे काय घ्यायचे असले तर सांग.’’
“एक कारा.”
“काय?’’
“मीही कविता लिहिल्यात. दोन-तीन वह्या भरल्यात. कपडय़ाच्या कपाटात ठेवल्यात. त्यातल्या कविता निवडून एखादे पुस्तक काढा.’’
हा घरचा आहेर खूप काही सांगणारा. अशा सातपुतेंचा गौरव ग्रंथ येतोय हे चांगलेच. सातपुतेंसारख्या माणसांची जिद्द कधी संपत नसते. त्यांचा तेच प्रकाश होतात, जो अखंड असतो. त्याचं वर्णन खूप वर्षांपूर्वी शांताराम आठवले यांनी ‘रामशास्त्राr’ चित्रपटात केलेलं आहे,
‘ही गोष्ट आहे पृथ्वीमोलाची
तू चाल रे गडय़ा तुला भीती कशाची?’
Comments are closed.