तो मुलाचा आवाज … माणसाचा आवाज
परमेश्वराची लीला माणसाच्या कल्पनाशक्तीच्याही पलिकडची आहे. त्याने निर्माण केलेल्या निसर्गात काहीवेळा असे जीव जन्माला येतात की आपण केवळ त्यांच्यासंबंधी आश्चर्य व्यक्त करु शकतो. बिहार राज्यातील सीतामढी जिल्ह्यातील नानपूर थाना क्षेत्रात एका बकरीचे करडू (पिल्लू) सध्या चर्चेचा विषय झाले आहे. या करडूला दोन तोंडे, चार डोळे आणि चार कान आहेत. तथापि, अशा प्रकारचे प्राणी अनेकदा जन्मला येतात. त्यामुळे यात फारसे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. मात्र, या करडूचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्या असे की त्याच्या घशातून माणसासारखा ध्वनी निघतो. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी लोकांची रीघ असते.
गावातील भावूक मनोवृत्तीचे लोक या करडूला परमेश्वराकडून मिळालेली देणगी मानत आहेत. या अद्भूत जीवाची दोन्ही तोंडे कार्यरत आहेत. याचा अर्थ असा की ते दोन्ही तोंडांनी दूध पिऊ शकते किंवा चारा खाऊ शकते. सध्या उत्तर भारतात श्रावण महिन्याचा प्रारंभ झाला आहे. उत्तर भारतात श्रावण महीना महाराष्ट्रातील श्रावणापेक्षा आधी लागतो. तेथेही तो अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. अशा श्रावण माहिन्यात या करडूचा जन्म व्हावा, हाही एक दैवी संकेत आहे, अशी ग्रामस्थांची भावना आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील लोक केवळ या करडूला बघण्यासाठी नव्हे, तर त्याच्या दर्शनासाठी येऊ लागलेले आहेत.
श्रावणासारख्या भक्तिमय महिन्यात देवाने असा चमत्कार घडवावा, ही शुभ घटना असून येणारे दिवस चांगले असणार हे यावरुन स्पष्ट होत आहे, अशी अनेकांची प्रतिक्रिया आहे. सोशल मिडियावरही सध्या हे करडू गाजत असून अनेकांनी ते पाहून त्यांची मते व्यक्त केली आहेत. आम्ही निसर्गाचे अनेक चमत्कार आजवर पाहिले आहेत. तथापि, अशी घटना मात्र प्रथमच घडत आहे. हे करडू कोणत्यातरी अन्य जगातले वाटते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. या करडूचा मालकही यामुळे आनंदित झाला असून तो या पिल्लाला तळहाताच्या फोडासारखे जपत असल्याचे दिसून येते. अनेक पत्रकारही आचंबित झाले आहेत.
Comments are closed.