वैष्णवी हगवणेची आत्महत्या हा हुंडाबळीच, महिला व बालकल्याण समितीचा धक्कादायक अहवाल

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱया पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी आपला पहिला अहवाल महिला व बालकल्याण समितीने सरकारला सुपूर्द केला आहे. सासरच्या मंडळींनी हुंडय़ासाठी केलेल्या छळामुळेच वैष्णवीने आत्महत्या केली असे अहवालात म्हटले आहे. तसेच हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करण्याची तसेच त्यांच्या पत्नीलाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने राज्यात महिलांवरील अत्याचार तसेच हुंडाबळीप्रकरणी चौकशी केली होती. वैष्णवीची जाऊ मयूरी हगवणे प्रकरणाची दखल घेतली असती तर वैष्णवीची आत्महत्या टाळता आली असती. त्यामुळे मयूरीची तक्रार न घेणाऱया पोलीस अधिकाऱयांवर कारवाई करण्याची शिफारसदेखील समितीने केली आहे. चौकशी करताना समितीला काही महत्त्वाची माहिती मिळाली. हुंडय़ाच्या माध्यमातून ब्रॅण्डेड गाडी, चांदीची भांडी, सोने, रोख रक्कम अशा विविध वस्तू आणि पैसे घेतल्याचे पुरावेदेखील समितीला मिळाले आहेत.

समितीचे निष्कर्ष

  • वैष्णवीला पती आणि सासरच्या लोकांकडून अमानुष मारहाण, छळ, जाच झाला.
  • हे प्रकरण पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार व हुंडाबळीचे आहे.
  • जालिंदर सुपेकरांची चौकशी करून त्यांचा सहभाग आढळल्यास निलंबित करून सहआरोपी करा.
  • जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीच्या खात्यात रुखवताच्या निमित्ताने हुंडय़ाचे पैसे हस्तांतरित झाले. त्यामुळे तिलाही सहआरोपी करा.
  • या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करा, आरोपी आणि सहआरोपी सुटणार नाहीत याची दक्षता घ्या.

Comments are closed.