आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय…; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिला सल्ला

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शीत झाला. यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राजकीय मित्र म्हणून एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्रातल्या प्रश्नांसंदर्भात कधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा होते का?, असा प्रश्न संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर भेट नाही झाली. सुरुवातीला एकदा जाऊन मी त्यांना पुष्पगुच्छ दिला होता. विधिमंडळात भेटीगाठी व्हायला हरकत नसावी. त्याचंही फार मोठं राजकारण झालं. गेलो होतो भेटायला…शेवटी ते मुख्यमंत्री आहेत. मानो या ना मानो…त्यांच्याकडून चांगलं व्हावं हीच अपेक्षा आजसुद्धा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उलट माझं तर म्हणणं आहे की, आता ज्या काही त्यांच्या सहकारी मंत्र्यांची भांडणं, लफडी बाहेर येताहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हे मी त्यांना आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय. आणि हा टोमणा नाही, हा सल्ला आहे हे आधीच स्पष्ट करतो, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

भाजपचं राजकारण हाणून पाडा- उद्धव ठाकरे

कोणावर अन्याय करू नका आणि तुमच्यावर अन्याय झाला तर तो सहन करू नका. जे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं तेच मीही सांगतोय. आणि पुन्हा एकदा ते जे बोलले होते ते सांगतो, मराठा विरुद्ध मराठेतर, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, 96 कुळी विरुद्ध 92 कुळी, स्पृश्य विरुद्ध अस्पृश्य, घाटी विरुद्ध कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून उभे रहा. नाहीतर मघाशी जो विषय झाला की, मराठा समाजाला भडकवलं जातंय तेच पुन्हा होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपची जी नीती आहे की, राज्यातल्या सगळ्या मोठ्या समाजाला आधी भडकवायचं. तो पेटला की त्याच्याविरुद्ध त्या समाजाव्यतिरिक्त जे समाज आहेत त्यांना चिथवायचं. जसं त्यांनी गुजरातमध्ये केलं, पटेलांना भडकवलं आणि पटेलेतरांना एकवटून सत्ता जिंकली. हरियाणात जाट समाजाला भडकवलं. त्यावेळी असं वाटलं, भाजपा आता गेलीच. कारण जाट आता पेटलाय. जाट बिचारे तिरीमिरीत पेटून उभे राहिले. तेव्हा जाटांची भीती दाखवून इतर समाजाला एकवटवलं. महाराष्ट्रात त्यांनी बटेंगे तो कटेंगे केलं, आपल्याला वाटलं, हिंदू-मुस्लिम. त्यांनी मराठा-मराठेतर केलं. मराठा समाजाच्या विरोधात ओबीसींना तयार केलं. मराठी भावंडांमध्येच समाजाच्या भिंती उभ्या करून आग लावायची आणि आपली पोळी भाजायची. हे जे भाजपचं राजकारण आहे ते हाणून पाडा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राज आणि उद्धव ठाकरेंची राजकीय युती होईल?

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील काय? दोघांची राजकीय युती होईल काय?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धुमाकूळ घालत आहे. आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे काय? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. मी तर स्पष्टच सांगतो की, अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करतायत. गुजराती आणि हिंदी वगैरे इतर भाषिकसुद्धा म्हणाले, ‘अच्छा किया आपने’, त्यांना झालेला हा आनंद मी बघतो. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=DML5GZ68JCE

संबंधित बातमी:

Uddhav Thackeray On Raj Thackeray: राज ठाकरेंसोबत युती झाल्यास महाविकास आघाडीचं काय?; अखेर उद्धव ठाकरे बोलले!

आणखी वाचा

Comments are closed.