अमित शाहांनी महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलंय, त्यात माणिकराव कोकाटेंचंही न
संजय राऊत: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा एक व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला आहे. यात माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केला आहे. अमित शाहांनी (Amit Shah) महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलंय, त्यात माणिकराव कोकाटेंचंही नाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊत म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलं आहे. त्यात त्यांचे देखील नाव आहे. अमित शाह यांनी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनाही त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात केलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही नावं आहेत, त्यात संबंधित कृषीमंत्र्यांचे नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
केंद्रातलं सरकार दुटप्पी आणि ढोंगी
संजय राऊत पुढे म्हणाले की, केंद्रातलं सरकार दुटप्पी आणि ढोंगी आहे. छत्तीसगड मधल्या अनेक राजकीय नेत्यांवर ऑनलाइन गेमिंग संदर्भात कारवाई झाली. भूपेश बघेल माजी काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत, चिरंजीवांना देखील ईडीने अटक केली. पण अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातले राजकारणी करत आहेत. सत्ताधारी करत आहेत. त्यांचा ऑनलाईन गेमिंगच्या पैशांमध्ये मोठा सहभाग आहे. त्यांच्यावर ईडीने किंवा सीबीआयने कुठलीही कारवाई केली नाही. जी छत्तीसगड, झारखंड, किंवा दिल्लीतल्या अनेक उद्योगपती आणि राजकारणांवर केली आहे. हा दुटप्पीपणाच आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केंद्र सरकारवर केला.
मनसे-शिवसेना युतीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत भूमिका स्पष्ट केली. ठाकरे बंधू एकत्रच आहेत. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? मी आता सुद्धा राज ठाकरे यांना फोन करू शकतो. त्यांच्याशी बोलू शकतो. त्यांना कधीही भेटू शकतो, असे त्यांनी म्हटले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, जर शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचे संकेत दिले असतील तर त्यांचा जो प्रश्न आहे कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? कोणाला काही समस्या, अडचण, पोटसूळ आहे का? माझा देखील तोच प्रश्न आहे. जर राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरच्या सभेत एक सकारात्मक वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत वक्तव्य केलंय. त्यामुळे यावर फार चर्चा न करता भविष्यात ज्या काही घडामोडी घडणार आहेत, त्याकडे लक्ष ठेवावे, असे त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=Knbif4ls9ow
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.