आशिया चषक क्रिकेट स्पर्धेवर अनिश्चिततेचे संकट, ढाक्यातील एसीसीची बैठक बीसीसीआयकडून बहिष्कृत

बीसीसीआयने 24 जुलैला ढाकामध्ये होणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. बांगलादेशातील राजकीय तणाव व मैदानावरील बिघडलेल्या परिस्थितीमुळे हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बैठकीचे ठिकाण बदलण्याची मागणी केली आहे. अन्यथा त्या बैठकीत मंजूर होणाऱ्या कोणत्याही प्रस्तावाचा बीसीसीआय बहिष्कार करेल. त्यामुळे यावर्षी टी-20 फॉरमॅटमध्ये होणारी आशिया चषक स्पर्धा अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेली आहे.

यंदाची आशिया चषक स्पर्धा हिंदुस्थानात होणार असली, तरी स्पर्धेच्या यजामात देशाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. अद्यापि या स्पर्धेचा अधिकृत कार्यक्रम ठरलेला नाही. तसेच एसीसीने स्थिर ठिकाण जाहीर केलेले नाही. स्पर्धा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी स्पष्टतेच्या अभावामुळे गोंधळ वाढत आहे. 24 जुलैच्या बैठकीचे ठिकाण बदलण्याच्या मागणीवर बीसीसीआयने जोर दिला असून, यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.

या घडामोडीची माहिती असलेल्या एका सूत्राने एएनआयला सांगितले की, हिंदुस्थान ढाकामध्ये आपले प्रतिनिधी पाठवणार नाही व आयोजनस्थळ बदलण्याचा आग्रह आधीच केला आहे. मात्र, ‘एसीसी’चे अध्यक्ष मोसिन नक्वी यांच्याकडून अद्यापि कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

सूत्रांनी पुढे सांगितले की, आशिया चषक फक्त तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा बैठकीचे स्थळ ढाकाहून अन्यत्र नेले जाईल. अध्यक्ष नक्वी हिंदुस्थानवर अनावश्यक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना बैठकीचे ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. मात्र, त्यावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. जर त्यांनी ढाकामध्येच बैठक घेतली, तर बीसीसीआय कोणत्याही प्रस्तावात सहभागी होणार नाही.

विशेष म्हणजे मोसिन नक्वी हे सध्या पीसीबीचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यांच्या या दुहेरी भूमिकेमुळे आशिया चषकाच्या तयारीतील राजकीय पेच अधिकच वाढत चालला आहे.

Comments are closed.