अजुनी रुसुनी आहे… व्हेअर इज तानाजी सावंत! पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमालाही दांडी

शिवसेनेशी गद्दारी करताना ‘आय अॅम द क्रिएटर’ अशी अहंकारी भाषा वापरणारे ‘खेकडा’ फेम माजी मंत्री तानाजी सावंत विधानसभा निवडणूक झाल्यापासून गायब आहेत. शनिवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमाकडेही सावंत यांनी पाठ फिरवल्याने त्यांना मतदान करणारे मतदार ‘व्हेअर इज तानाजी सावंत?’ असा प्रश्न विचारू लागले आहेत.
शिवसेनेशी करताना गद्दारी मी स्वतः दीडशे बैठका घेतल्या, अशी फुशारकी तानाजी सावंत यांनी मारली होती. त्यानंतर आपल्या वाचाळपणामुळे त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले. लोकसभेच्या निवडणुकीत तानाजी सावंतांनी गद्दारीची पिपाणी वाजवली. विधानसभा निवडणुकीत परांडेकरांनी काठावर विजयी करून सावंतांना त्यांची लायकी दाखवून दिली. एवढा पैसा खर्चुन, माणसे विकत घेऊन मते कमी कशी काय पडली? यावर गेल्या सहा महिन्यांपासून तानाजी सावंत हे मतदारसंघ वाऱ्यावर सोडून पुण्यात चिंतन करत आहेत.
मराठा आंदोलकांचा पालकमंत्र्यांना घेराव
कुणबी असल्याचे पुरावे असतानाही जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून जाणीवपूर्वक अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप करून मराठा आंदोलकांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घातला. यावेळी मराठा आंदोलक आणि पालकमंत्र्यांमध्ये चकमकही उडाली. त्यानंतर सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोनवरच झापले आणि कुणबी पुरावे असतील तर तत्काळ प्रमाणपत्र देण्याची सूचनाही केली.
लोकप्रतिनिधीच नसल्यामुळे प्रशासकीय कामे खोळंबली आहेत. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी लोकसहभागातून 15 लाख झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि अभिनेता स्वप्निल जोशी यांच्या उपस्थितीत आज त्याची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील झाडून सारे नेते उपस्थित होते. कार्यक्रम पत्रिकेवर शिष्टाचाराप्रमाणे परंड्याचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे नाव होते. प्रशासनाने त्यांच्याशी संपर्कही केला. परंतु सावंत यांनी शिरस्त्याप्रमाणे कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
मिंध्यांमध्ये भाऊबंदकी
शिवसेनेशी गद्दारी केल्यानंतर जिल्ह्यातील मिंधे गटाची सूत्रे तानाजी सावंत यांनी आपल्या हाती घेतली होती. लोकसभेसाठी सावंत यांनी आपल्या नातलगाला तिकीट मागितले. त्याला मिंधे गटातील सटरफटर कार्यकर्त्यांनीही विरोध केला. त्यामुळे जळफळाट झालेल्या सावंत यांनी परंड्याकडेच पाठ फिरवली. सध्या मिंधे गटाचे सूत्रधार ज्ञानराज चौगुले आहेत. चौगुले आणि सावंत यांच्यातून विस्तव आडवा जात नाही.
Comments are closed.