वेबसाइटवर श्री अंबाबाईची दिशाभूल करणारी माहिती, भाविकांमध्ये संतापः पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे देश-विदेशांत भाविक आहेत; परंतु या मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिकृत वेबसाइटवर देवीची दिशाभूल करणारी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
या माहितीत श्री अंबाबाईच्या नावाचा कोणताही उल्लेख नाही. वारंवार श्री महालक्ष्मीसह इतर देवींची नावे संबोधण्यात आल्याने हे जाणीवपूर्वक एक षडयंत्र रचल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. दरम्यान, देवस्थान समितीकडूनही या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्यासह दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिकृत वेबसाईटवर देवीची माहिती दिशाभूल करणारी आहे. याबाबत सन २०११ पासून असलेली ही गंभीर बाब ‘प्रजासत्ताक’ सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी चव्हाट्यावर आणली असून, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रारही दाखल केली आहे.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई ही शिवपत्नी असून, तिच्या माथ्यावर नागाचे चित्र आहे. पौराणिक संदर्भ पाहता, हेमाडपंती बांधकामशास्त्राने उभारलेले हे मंदिर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ म्हणून परिचित आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांच्या कालखंडात श्री अंबाबाईला विष्णुपत्नी श्री महालक्ष्मी संबोधून त्यासाठी तिरूपती बालाजी येथून नवरात्रोत्सवात विजयादशमीला परिधान करण्यासाठी मानाचा शालू पाठविला जात होता. व्यावसायिक कारणातून हा चुकीचा पायंडा पडत असल्याने कोल्हापूरकरांनी याविरोधात आवाज उठविला. परिणामी, विष्णुपत्नीऐवजी आता तिरूपती देवस्थानकडून नवरात्रोत्सवात देवीला केवळ मानाचा म्हणून शालू स्वीकारला जात आहे. एकीकडे करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे ‘श्री महालक्ष्मीकरण’ असा चुकीचा प्रघात होऊ नये, यासाठी कोल्हापूरवासीय आग्रही असतानाच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अधिकृत वेबसाइटवरच श्री अंबाबाईसंदर्भात चुकीची व दिशाभूल करणारी, तसेच आक्षेपार्ह माहिती असल्याचे चव्हाट्यावर आले आहे.
वेबसाइटवर विष्णुपत्नी श्री महालक्ष्मीसह अन्य देवींचाच नामोल्लेख अधिक आहे. श्री अंबाबाईचे नाव एकदाही यामध्ये दिसून येत नाही. त्यामुळे श्री अंबाबाई मंदिरासंदर्भातील धार्मिक, पौराणिक, तसेच ऐतिहासिक संदर्भपाहता, वेबसाइटवरील श्री अंबाबाई संदर्भातील माहिती ही जगभरातील भाविकांसाठी दिशाभूल करणारी असल्याने याबाबत दिलीप देसाई यांच्याकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, याची गांभीयनि दखल घेऊन पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी यासंदर्भात देवस्थान समिती सचिवांकडे विचारणा केली आहे.
चुकीची माहिती टाकणाऱ्यावर कारवाई करा!
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवी मंदिराबाबत यापूर्वीही चुकीच्या प्रवृत्तींविरोधात कोल्हापूरकरांनी विविध आंदोलने, तसेच प्रबोधनात्मक लढा देत व्यापारीकरणाचे मनसुबे उधळून लावले. पण या मंदिराचे व्यवस्थापन असलेल्या समितीच्या अधिकृत वेबसाइटवरच चुकीची, दिशाभूल करणारी आणि आक्षेपार्ह माहिती पाहता, भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. शिवाय जगभरात विखुरलेल्या भाविकांसमोर या चुकीच्या माहितीमुळे देवीचे खरे माहात्म्य झाकोळले जाण्याची शक्यता आहे. गेल्या 13 वर्षांपासून या चुकीच्या माहितीकडे सर्वांचेच झालेले दुर्लक्षही तितकेच गंभीर असल्याचे ‘प्रजासत्ताक’ सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी सांगितले. तसेच ही चुकीची माहिती देणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी अपेक्षाही देसाई यांनी व्यक्त केली.
वादग्रस्त मजकूर हटविला, पण ऑनलाइन देणगीचा घोटाळा
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अधिकृत वेबसाइटवरील श्री अंबाबाई संदर्भातील आक्षेपार्ह मजकूर हटविण्यात आला. सन 2011 पासून असलेली ही माहिती नेमकी कोणी अपलोड केली, याचा शोध सुरू केला आहे. या मजकूरप्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल. तसेच लवकरच अधिकृत माहिती अपलोड केली जाईल, असे जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी सांगितले. दरम्यान, ही वेबसाइट तपासताना अनेक बनावट अॅप्सद्वारे श्री अंबाबाईंच्या नावाने निधी संकलित करणाऱ्या अॅप्सचा सुळसुळाट असल्याचे उघड झाले आहे. लवकरच याबाबत पोलीस कारवाई करणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकारी येडगे यांनी बनावट अॅपधारकांना दिला आहे.
Comments are closed.