मी अन् राज एकत्र आल्यानं इतर भाषिकांनासुद्धा आनंद; गुजराती आणि हिंदी वगैरे भाषिकही ‘अच्छा किया’

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. 5 जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या मराठी विजयी मेळाव्याला दोन्ही भाऊ एकत्र आले आणि राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली. तब्बल 20 वर्षांनी दोन्ही भाऊ एकत्र आले, राज आणि उध्दव यांच्या एकत्र येण्याने मराठी माणसाने आनंद व्यक्त केला, त्यानंतर आता आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी दोन्ही भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का? याबाबत अनेक चर्चा आहेत.  संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. दरम्यान उध्दव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. त्याचबरोबर आम्ही (राज-उध्दव ठाकरे) एकत्र येण्याने मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. गुजराती, हिंदी वगैरे इतर भाषिकसुद्धा म्हणाले, ‘अच्छा किया आपने’, असं म्हणत असल्याचं यावेळी उध्दव ठाकरेंनी सांगितलं आहे.

आम्ही एकत्र आल्यामुळे प्रॉब्लेम कुणाला आहे?

संजय राऊत यांनी विचारलेल्या ‘हिंदी सक्तीविरुद्ध शिवसेना आणि मनसे… उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा एकत्रित मोर्चा 5 जुलैला काढण्याचे जाहीर झाले. संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली. या सगळ्या 20 वर्षांच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले…’, या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ‘आम्ही एकत्र आल्यामुळे प्रॉब्लेम कुणाला आहे?’

राऊतांच्या प्रॉब्लेम कुणालाच नाही, पण काही लोकांना असू शकतो…या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, ‘मग त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील, आपण का विचार करायचा?’

राऊतांच्या, या एकत्र मोर्चाच्या चर्चेने मराठी अस्मितेची एक लाट निर्माण झाली… आणि या लाटेने उद्धव आणि राज यांना 20 वर्षांनंतर एकत्र आणलं…या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ‘आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. मी तर स्पष्टच सांगतो की, अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करतायत. गुजराती आणि हिंदी वगैरे इतर भाषिकसुद्धा म्हणाले, ‘अच्छा किया आपने’. त्यांना झालेला हा आनंद मी बघतो. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो. कुणाची माय व्यायली आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी!’.

संजय राऊतांच्या पुढच्या, यात पोटशूळ उठावं असं काय आहे? पण तो उठलाय…या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, मला काय माहीत. ज्यांचा पोटशूळ उठलाय त्यांना विचारा. मी आनंदाकडे बघतो. मी यातली पॉझिटिव्ह बाजू बघतो. तर आपण दोघे एकत्र आल्यामुळे सरकारला माघार घ्यावी लागली…यावर ठाकरेंनी होय, नक्कीच, असं उत्तर दिलं आहे.

तर, ‘आणि त्यानंतर या मोर्चाचं रूपांतर एका विराट अशा विजयी मेळाव्यात झालं. हा विजयी मेळावा केवळ वरळीत नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला…’, यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ‘संपूर्ण देशभरात झाला. मी मघाशी सांगितलं की, महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्यं असं अजिबात झालेलं नाही. जे काही मोजके असतील त्या इतर भाषिकांनीसुद्धा आम्हाला मेसेज पाठवले किंवा निरोप पाठवले की, ‘बहोत अच्छा किया आपने’. यात मुंबईतले अमराठीसुद्धा आहेत. त्यांनीही सांगितलं की, तुम्ही असं लढलंच पाहिजे. एकत्रित लढे दिले पाहिजेत’,असंही पुढे ठाकरे म्हणाले.

त्या मंचावर राज ठाकरे असे म्हणाले की, बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल. तुम्हीही असं वारंवार म्हणालात की, लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू. याचा अर्थ महाराष्ट्राने काय घ्यायचा? या राऊतांच्या प्रश्नावर, लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू असाच याचा अर्थ आहे, असं उध्दव ठाकरे म्हणालेत.

राऊतांचा प्रश्न- मराठी माणसाने मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणं हे ठीक आहे. ते होणार…

ठाकरेंचं उत्तर- आलं पाहिजे. कारण शेवटी आम्ही कोणासाठी लढतोय? मराठी माणसासाठीच.

राऊतांचा प्रश्न-  लोकांचा रेटा आहे की, राजकीयदृष्ट्या एकत्र यावं…

ठाकरेंचं उत्तर-  आता 20 वर्षांनी एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही. मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे.

राऊतांचा प्रश्न- यासंदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे का?

ठाकरेंचं उत्तर-  चर्चाही होईल… पण त्याआधी आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय. हेही नसे थोडके! हे खूप मोठे आहे. म्हणून मी त्या दिवशीच्या भाषणात म्हटले की, आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे.

राऊतांचा प्रश्न- उद्धवसाहेब, मुंबईसह 27 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका होतील की नाही याची अजूनही लोकांना खात्री वाटत नाही. कारण गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळ या महापालिका प्रशासन चालवत आहे. जी या राज्याची राजधानी आहे त्या मुंबई महानगरपालिकेतसुद्धा प्रशासकाचे राज्य आहे. तिथे वेगवेगळ्या मार्गाने प्रचंड लूट सुरू आहे. या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा त्या आपण कशा प्रकारे लढणार आहात?

ठाकरेंचं उत्तर-  निवडणूक ही जिंकण्याच्या उद्देशानेच लढावी लागते आणि तशीच लढणार आहोत.

राऊतांचा प्रश्न- त्यात महाविकास आघाडी आहे?

ठाकरेंचं उत्तर- आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मध्यंतरी काँग्रेसशी बोलणं झालं. तर त्यांचं म्हणणं आहे की, कदाचित ते स्थानिक पातळीवर निर्णय घेतील. ठीक आहे. तसं असेल तर तसं करू.

अशी चर्चा सुरू आहे की, शिवसेना आणि मनसे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी भविष्यात एकत्र येऊन राजकीय निर्णय घेतला तर मविआचे काय होणार हा एक प्रश्न त्यात निर्माण होतो. मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे. ठाणे स्वतंत्र विषय आहे…

– हे पहा, मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीयदृष्ट्याही कदापिसुद्धा वेगळी समजत नाही. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा वेगळा आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही. राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी जसं शिवसेनेचं युनिट आहे तसं इतर पक्षांचंही आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या जे योग्य वाटत असेल तसेच करू. लढायचं तर नक्कीच आहे.

https://www.youtube.com/watch?v=spu4oAlcvge

Comments are closed.