महाराष्ट्राच्या हिताची, मराठीच्या स्वाभिमानाची भूमिका मांडल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात याचिका; संजय राऊत यांची भूमिका

ठाकऱ्यांना गुन्हे, याचिका, सुप्रीम कोर्ट नवे नाही असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या हिताची मराठीच्या स्वाभिमानाची भुमिका मांडल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले असतील, तर उद्धव ठाकरे यांचा जो प्रश्न आहे की कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? कुणाला काही पोटशूळ आहे का? माझाही तोच प्रश्न आहे. जर राज ठाकरे यांनी मीरा भाईंदरच्या सभेत एक सकारात्मक विधान केले होते, उद्धव ठाकरे यांनी मुलाखातीत एक विधान केले आहे. त्यामुळे यावर फार काही चर्चा न करता भविष्यात ज्या काही घडामोडी घडणार आहेत, त्याकडे तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे इतकंच मी सांगेन.

तसेच ठाकऱ्यांना गुन्हे, याचिका, सुप्रीम कोर्ट नवे नाही. मग माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील. या याचिका कशासाठी आहेत. तर महाराष्ट्राच्या हिताची मराठीच्या स्वाभिमानाची भुमिका मांडल्याबद्दलची या याचिका आहेत. तर त्याचे एवढे बाऊ करण्याचे कारण नाही. शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे अशा प्रकारचे याचिका आणि खटले हे आमचे मेडल्स आहेत. ही पदकं महाराष्ट्रातील स्वाभिमानी नेत्यांकडे असलीच पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.

अजित पवार गट असो किंवा मिंधे गट, या पक्षाचे प्रमुख लौकिकदृष्ट्या अमित शहा आहेत. अमित शहांनी या दोन्ही पक्षांना जन्म दिला आहे. त्यामुळे हे पक्ष विलीन होतील की नाही हा प्रश्न मला निरर्थक वाटतो. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आहेत आणि राहतील. काल इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवार उपस्थित होते आणि त्यांनी आपली भूमिका मांडली. मी पवार साहेबांना जास्त ओळखतो. आज सकाळीच माझे आणि पवारांचे या विषयावर बोलणं झालं. हे संपूर्ण विषय महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीबद्दल होते. शरद पवार यांनी काही चिंता आणि काही भूमिका व्यक्त केल्या. दिल्लीत बसून आम्ही यावर चर्चा करणार आहोत. त्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांशी इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत असे संजय राऊत म्हणाले.

काल आम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्या बैठकीला होतो. सरकार स्वतःच घेरलेले आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरसंदर्भात प्रेसिडेन्ट ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवल्याचा दावा केला होता. या विषयावर आम्ही प्रश्न विचारणार आहोत. पहलगाममध्ये जो हल्ला झाला आणि 26 महिलांवरच्या कपाळावरचे कुंकू पूसले गेले, हे एक भयंकर घटना आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोर ते आव्हान आहे. आणि ते अपयशी ठरल्याबद्दल अमित शहांचा राजीनामा मागायला पाहिजे. ऑपरेशन सिंदूरमध्ये अपमानास्पद जी माघार घ्यावी लागली, ट्रम्पच्या दबावाखाली व्यापाऱ्याच्या आमिषामुळे तो एक गंभीर विषय आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी अमित शहा यांचा राजीनामा मागणं सोयीचं आहे असेही संजय राऊत म्हणाले.

अमित शहांचा राजीनामा का मागू नये? अमित शहा कोणा आहेत. या देशात पठाणकोट होतं, पुलवामा होतंय, उरी होतंय, पहलगाम होतंय. रोज हत्या होत आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेत चूक होत असताना गृहमंत्री राजकारण करत त्यांच्या खुर्चीवर कसे काय बसू शकतात. ऑपरेशन सिंदूर करत आहात. या सिंदूर पुसण्याला तुम्हीच जबाबदार आहात. तुमचा राजीनामा मागावाच लागेल.

माझ्या माहितीनुसार आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच हॉटेलमध्ये होते. जसे दोन नेते विधानसभेत एकत्र असतात. एखाद्या राजकीय मंचावर एकत्र असतात. उद्धव ठाकरेसुद्धा फडणवीसांना भेटलेले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात हे प्रश्न निर्माण होतात. ते भेटले की नाही हे दोन नेतेच सांगू शकतील. पण एक नक्की, मिंधें गटाच्या पोटात भितीचा गोळा आला असं मला कुणीतरी सांगितलं. आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच हॉटेलमध्ये होते, वेग वेगळ्या कामासाठी आणि ते काम संपवून ते निघून गेले असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Comments are closed.