मुख्यमंत्र्यांच्या बायकोची एका दिवसात 79 कोटींची कमाई, नारा भुवनेश्वरींची संपत्ती का वाढली?

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी (18 जुलै) मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. मात्र, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांची मुख्य गुंतवणूक असलेल्या हेरिटेज फूडस लिमिटेडच्या स्टॉकमध्ये 7.7 टक्क्यांची वाढ झाली. हेरिटेज फूडसचा स्टॉक शुक्रवारी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 49 रुपयांवर पोहोचला होता. हेरिटेज फूडस लिमिटेडचा स्टॉक शुक्रवारी 32.90 रुपयांनी वाढून 491 रुपयांवर पोहोचला. यामुळं नारा भुवनेश्वरी यांची संपत्ती एकूण 79 कोटी रुपयांनी वाढली आहे.

हेरिटेज फूडसच्या स्टॉकमध्ये एकाच दिवसात 7.7 टक्क्यांची वाढ झाल्यानं नारा भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत 78 कोटी 80 लाख 11 हजार 646 रुपयांची वाढ झाली. नारा भुवनेश्वरी यांच्याकडे हेरिटेज फूडसचे 2,26,11,525 शेअर आहेत. कंपनीतील त्यांची भागीदारी जून 2025 च्या रिपोर्टनुसार 24.37 टक्के इतकी आहे.

हेरिटेज फूडसनं त्यांचे आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालांनतर कंपनीच्या स्टॉकमध्ये मोठी वाढ झाली. या कंपनीची स्थापना चंद्राबाबू नायडू यांनी 1992 मध्ये केली होती. हेरिटेज फूडस ही दक्षिण भारतातील डेअरी कंपनी आहे. डेअरी, रिटेल आणि कृषी उत्पादनांशी संबंधित क्षेत्रात कंपनी काम  करते. हेरिटेज फूडसचं मुख्यालय हैदराबादमध्ये आहे. एफएमसीजी क्षेत्रातील ही महत्त्वाची कंपनी आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या रिपोर्टनुसार डिसेंबर 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार चंद्राबाबू नायडू देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांची संपत्ती 932 कोटी रुपयांची आहे. तर, नारा भुवनेश्वरी यांच्याकडे हेरिटेज फूडसमधील सर्वाधिक शेअर आहेत.

कोण आहेत नारा भुवनेश्वरी?

नारा भुवनेश्वरी या तेलुगु सिनेविश्वातील दिग्गज अभिनेते आणि तेलुगु देसम पार्टीचे संस्थापक एनटी रामाराव यांच्या कन्या आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्याशी त्यांचे भेट राजकारणात झाली होती. चंद्राबाबू नायडू आणि नारा भुवनेश्वरी यांचा विवाह 1981 मध्ये झाला होता. नारा भुवनेश्वरी या हेरिटेज फूडस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक आणि व्हाइस चेअरमन आहेत.

दरम्यान, 18 जुलै रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर विविध कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत.त्यामुळं शेअर बाजार सुरु झाल्यानंतर सोमवारी त्या कंपन्यांचे स्टॉक्स वाढतात का घसरतात ते पाहावं लागेल.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.