लातूरमध्ये सुनील तटकरेंसमोरच राडा; छावा संघटनेने पत्ते उधळल्याने जोरदार हाणामारी

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रविवारी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत असताना त्यांच्यासमोरच राडा झाला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट पत्रकार परिषदेत येत जोरदार घोषणाबाजी केली. पत्ते उधळत त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनामाची मागणी केली. त्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.

अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रविवारी लातूरमध्ये आले होते. त्यांच्यासोबत उदगीरचे आमदार संजय बनसोडेदेखील होते. येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी ते बोलत असताना अचानक छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत येत राज्याच्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. विधानसभेत कृषिमंत्री रमी खेळत असल्याचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्यची मागणी करणारे निवेदन सुनील तटकरे यांना दिले. हे कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी थेट त्याठिकाणी पत्ते उधळले. अचानक झालेल्या आंदोलनाने गोंधळ उडाला होता. कृषिमंत्र्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली.

Comments are closed.