ड्रग्ज माफिया ‘पगली’ कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध, अमली पदार्थविरोधी कक्षाची धडक कारवाई

समाजामध्ये ड्रग्जची पाळेमुळे पसरविणाऱ्या व पेडलर्सद्वारे तरुण-तरुणींना ड्रग्जचे व्यसन लावणाऱ्या एका ड्रग्ज माफिया महिलेला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मजबूत दणका दिला. या पथकाने रोमा आरिफ शेख ऊर्फ पगली (37) हिला एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
रोमा आरिफ शेख ऊर्फ पगली ही ड्रग्ज माफिया आहे. तिच्या विरोधात एनडीपीएसचे आठ गुन्हे दाखल आहेत. तिच्या विरोधात सात गुह्यात दोषारोपपत्रदेखील दाखल आहेत. तिच्यावर प्रतिप्रंबधक कारवाईदेखील करण्यात आली होती. एका गुह्यात ती कारागृहात होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर पगलीने पुन्हा ड्रग्जचा धंदा सुरू केला. त्यामुळे तिला जरब बसविणे आवश्यक असल्याने उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटचे प्रभारी निरीक्षक विशाल चंदनशिवे व पथकाने गृह विभागाकडे एक प्रस्ताव पाठवून पगलीला स्थानबद्ध करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली होती.
त्याचदरम्यान पगलीवर भायखळा पोलीस ठाण्यात एनडीपीएसचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे काहीही झाले तरी रोमा ऊर्फ पगली ही ड्रग्जचा धंदा सोडत नसल्याने शासनाने तिला स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार वांद्रे युनिटने तिला ताब्यात घेऊन एक वर्षाकरिता कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Comments are closed.