भारत-नेपाळ सीमेवर आजपासून चर्चा

जेन झेड निदर्शनानंतर पहिली बैठक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि नेपाळदरम्यान वार्षिक सीमा चर्चा 12 नोव्हेंबरपासून दिल्लीत सुरू होणार आहे. ही बैठक 3 दिवसांपर्यंत चालणार असून दोन्ही देशांचे सुरक्षा दल म्हणजेच भारताचे सशस्त्र सीमा दल (एसएसबी) आणि नेपाळच्या आर्म्ड पोलीस फोर्सचे (एपीएफ) प्रमुख यात सामील होणार आहेत.  सप्टेंबरमध्ये नेपाळमध्ये झालेल्या जेन झेड निदर्शनानंतर दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांदरम्यान ही पहिलीच उच्चस्तरीय चर्चा असल्याने ही बैठक खास मानली जात आहे.

चर्चेत सीमापार गुन्हे रोखणे, रियल टाइम गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करण्याची प्रणाली आणि दोन्ही देशांदरम्यान समन्वित सीमा व्यवस्थापनावर विशेष जोर देण्यात येणार आहे. ही बैठक सीमेवर शांतता आणि सुरक्षेला आणखी मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.

भारताच्या वतीने या बैठकीचे नेतृत्व एसएसबीचे महासंचालक संजय सिंगल करणार आहेत. तर नेपाळच्या वतीने एपीएफचे महानिरीक्षक राजू आर्यल यांची टीम भाग घेणार आहे. या चर्चेत सीमापार गुन्ह्यांना संयुक्तपणे रोखण्यासाठी प्रभावी व्यवस्था विकसित करणे, वास्तविक वेळेत माहिती पुरविण्यासाठी जलद आणि अधिक कुशल माध्यम स्थापन करणे आणि भारत-नेपाळ सीमेवर शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी समन्वित सीमा व्यवस्थापन प्रथांना सुदृढ करण्यावर विशेष जोर देण्याची अपेक्षा असल्याचे एसएसबीने म्हटले आहे.

सीमेची देखरेख

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात काठमांडू येथे ही बैठक पार पडली होती. एसएसबी भारत-नेपाळच्या 1,751 किलोमीटर लांब खुल्या सीमेची देखरेख करते. या सीमेवर कुंपण नाही. याचबरोबर हे सुरक्षा दल 699 किलोमीटर लांब भारत-भूतान सीमेच्या सुरक्षेचीही जबाबदारी सांभाळते.

Comments are closed.