एक्झिट पोलमध्ये एनडीएची आघाडी
बिहारमध्ये विक्रमी मतदान, द्वितीय टप्प्यात 70 टक्के, मतगणना शुक्रवारी, आयोगाची सज्जता
वृत्तसंस्था / पाटणा, नवी दिल्ली
बिहारमध्ये 2025 च्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) निष्कर्षही समोर आले असून बहुतेक सर्व सर्वेक्षणांमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सरशी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. बिहार विधानसभेत 243 स्थाने असून त्यांच्यापैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सरासरी 148 स्थाने मिळतील तर महागठबंधनला 88 जागांवर समाधान मानावे लागेल, असा हा निष्कर्ष आहे. तथापि, खरी परिस्थिती 14 नोव्हेंबरला, अर्थात येत्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या द्वितीय टप्प्याचे मतदान मंगळवारी संध्याकाळी साधारणत: साडेसहाला संपले. या टप्प्यातील मतदानाने प्रथम टप्प्यातील 65 टक्के मतदानाचा विक्रमही मागे टाकला आहे. द्वितीय टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच 67.45 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे अंतिम टक्केवारी 70 टक्क्यांच्या पुढे जाईल असे अनुमान आहे. बुधवारी निश्चित टक्केवारी समजणार आहे. दोन्ही टप्पे मिळून एकंदर मतदान 68 टक्के होणार आहे. हा बिहारच्या 1951 पासूनच्या निवडणूक इतिहासातील विक्रम सिद्ध होणार आहे.
मतदानोत्तर सर्वेक्षणांचा कल
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर अनेक सर्वेक्षण संस्थांनी त्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच विजयी होईल, अशी शक्यता या निष्कर्षांमधून दिसून येत आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या जवळपास सर्व सर्वेक्षणांचे हेच अनुमान आहे. विरोधी पक्षांनी ही अनुमाने नाकारली आहेत. मतगणनेच्या दिवशी चित्र वेगळे राहणार असून महागठबंधनचा विजय होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. तर, आमच्या आघाडीला मतदानोत्तर सर्वेक्षणांनी काढलेल्या निष्कर्षांपेक्षाही कितीतरी अधिक स्थाने मिळतील. आमचा दणदणीत विजय होईल, असा विश्वास सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. कोणाचे म्हणणे खरे ठरणार हे शुक्रवारीच समजून येणार आहे.
मतगणना शुक्रवारी
बिहार विधानसभा निवडणुकीची मतगणना 14 नोव्हेंबरला, अर्थात, येत्या शुक्रवारी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतगणनेसाठी सर्व सज्जता पूर्ण केली आहे. मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष काहीही असले, तरी खरे चित्र शुक्रवारी रात्रीपर्यंत स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत सर्वांची उत्कंठा ताणलेली राहणार आहे.
मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष
सर्वेक्षण संस्था रालोआ महागठबंधन इतर
चाणक्य स्टेटेजीज 130 ते 138 100 ते 108 3 ते 5
पीपल्स इनसाईट 133 ते 148 87 ते 102 3 ते 6
दैनिक भास्कर 145 ते 160 73 ते 81 5 ते 10
जेव्हीसीज पोल 135 ते 150 88 ते 103 3 ते 6
मॅटराईझ 147 ते 167 70 ते 90 2 ते 10
पीपल्स पल्स 133 ते 159 75 ते 101 2 ते 13
न्यूज 18 140 ते 150 85 ते 95 0 ते 5
पी मार्ग 142 ते 162 80 ते 98 3 ते 8
टीआयएय रीसर्च 154 ते 163 76 ते 95 3 ते 6
साधारण सरासरी 150 90 3
Comments are closed.