भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी 3 मुस्लिम देश एकत्र आले आहेत

भारताला वाढविणार कच्च्या तेलाची निर्यात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताच्या तेल कंपन्या दीर्घकाळापासून रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करत होत्या, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन कच्च्या तेलाच्या आयातीप्रकरणी भारतावर वाढीव आयातशुल्क लादले होते. यामुळे भारताने रशियन कच्च्या तेलाची आयात हळूहळू कमी करण्यास सुरुवात केली. हे पाहता मध्यपूर्वेतील मुस्लीम देशांनी भारताच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला आहे. या देशांनी भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्यपूर्वेतील मोठे तेल उत्पादक देश सौदी अरेबिया, इराक आणि कुवैतने डिसेंबरमध्ये भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिफायनरीज रशियन कच्च्या तेलाचा पर्याय शोधत असताना या तीन देशांनी हा पुढाकार घेतला आहे. भारतीय तेल कंपन्या पाश्चिमात्य निर्बंधांमुळे रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी रोखत आहेत. यामुळे ओपेक उत्पादकांना जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्चे तेल ग्राहक आणि आयातदार देश म्हणजेच भारतीय बाजारपेठेत हिस्सेदारी प्राप्त करण्यास मदत मिळाली आहे.

पाश्चिमात्य देशांकडून निर्बंध

ब्रिटन, युरोपीय महासंघ आणि अमेरिकेने मागील महिन्यात रशियाच्या आघाडीच्या तेल कंपन्या रोसनेफ्ट आणि लुकोइलवर निर्बंध लादले होते. यामुळे भारत आणि चीनमधील तेल कंपन्यांसमोर अडचण उभी राहिली होती. भारतीय रिफायनरींना दोन सर्वात मोठ्या ओपेक उत्पादकांकडून कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर कमीतकमी एका रिफायनरला इराककडुन मागील महिन्याच्या तुलनेत अधिक मासिक पुरवठा मिळणार आहे.

भारतीय कंपन्यांना वाढला पुरवठा

सौदी अरामकोने अन्य एका भारतीय रिफायनरचा पुरवठा वाढवला आहे. तर इराकच्या सरकारी तेल विपणन कंपनी सोमोने देखील भारताला होणारा कच्च्या तेलाचा पुरवठा वाढविणार असल्याचे सांगितले आहे. कुवैत पेट्रोलियम देखील चालू महिन्यात आणि डिसेंबरमध्ये भारतीय रिफायनरींना अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा करणार आहे.

मध्यपूर्वेत कच्च्या तेलाचे अधिक साठे

मध्यपूर्वेत पुरवठादारांकडे कच्च्या तेलाचे अधिक साठे आहेत. सौदी अरामको अणि सोमोकडून अधिकृत विक्री मूल्य कमी करण्यात आल्यावर भारतीय रिफायनर देखील अधिक पुरवठ्याची मागणी करत आहेत. निर्बंधाच्या नवीन टप्प्यानंतर भारतीय कंपन्या आता मध्यपूर्व, इराक आणि अमेरिकेकडून अधिक प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत आहेत.

Comments are closed.