युद्धात विजय महत्त्वाचा : सीडीएस चौहान

युद्धात रौप्य पदक नसते : तंत्रज्ञानामुळे बदलल्या युद्धाच्या पद्धती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकावर झालेल्या कार विस्फोटावरून वातावरण तापलेले असताना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी महत्त्वाचे वक्तव्य केले. युद्धात केवळ विजय महत्त्वाचा असतो, यात दुसरे स्थान किंवा साहसी प्रयत्नांसाठी सांत्वना पुरस्कार नसतो. युद्धाचे कठोर सत्य म्हणजे यात राष्ट्रांचे भविष्य आणि अस्तित्व पणाला लागलेले असते, याचमुळे सैन्य कमांडर प्रत्येक युगात स्वत:च्या विरोधकांवर आघाडी घेण्यासाठी प्रत्येक शक्य रणनीति अंमलात आणत असतो असे उद्गार चौहान यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात युद्ध आणि रणनीति विषयावर बोलताना काढले आहेत.

युद्ध आणि त्यातील विजय रणनीतिवर निर्भर असतो. इतिहासात रणनीति मुख्यत्वे भूगोलाने प्रेरित होती, परंतु आता तंत्रज्ञानाने भूगोलाला मागे टाकले असून तंत्रज्ञानाचा दबदबा वाढला आहे. पूर्वी युद्ध, अभियान आणि पूर्ण युद्ध प्रभावी रणनीति आणि रणकौशल्याने जिंकता येत होते. प्राचीन आणि मध्यकाळात भूभागांनी रणनीतिला प्रभावित पेले, भूगोलाने युद्ध, अभियान आणि संघर्षांचे परिणाम निश्चित करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, जे कमांडर भूगोल समजत होते, ते याचा लाभ घेण्यास यशस्वी ठरले होते असे सीडीएस चौहान यांनी म्हटले आहे.

तंत्रज्ञानाची वाढती भूमिका

आधुनिक युद्धांमध्ये तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर सीडीएस चौहान यांनी प्रकाशझोत टाकला. आजच्या काळात ड्रोन, सायबरयुद्ध आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि अंतराळ-आधारित तंत्रज्ञानांनी युद्धाच्या पद्धती बदलुन टाकल्या आहेत. भविष्यातील युद्धांमध्ये तांत्रिक श्रेष्ठताच विजयासाठी कारणीभूत ठरणार आहे. याचमुळे सैन्यनेत्यांनी नव्या तंत्रज्ञानांना स्वीकारून स्वत:च्या शत्रूच्या एक पाऊल पुढे राहण्याची गरज असल्याचे जनरल चौहान यांनी म्हटले आहे.

सैन्य रणनीति विकसित करावी लागणार

युद्धात नेहमीच मोठी गोष्ट पणाला लागलेली असते. राष्ट्रांची सुरक्षा आणि सार्वभौमत्व युद्धाच्या परिणामावर निर्भर करते. याचमुळे सैन्य रणनीतिला गतिशील आणि काळासोबत विकसित व्हावे लागेल. भारत प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये भारताने स्वदेशी शस्त्रास्त्रs, ड्रोन आणि सायबर क्षमतांमधील गुंतवणूक वाढविली आहे. क्षेत्रीय आणि जागतिक सतरावर भू-राजकीय तणाव वाढत असताना सीडीएस चौहान यांनी ही भूमिका मांडली आहे.

Comments are closed.