भाव पडल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यातील खड्डे कांद्यांनी भरले, संगमनेरात संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन; महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी

कांद्याला क्विंटलला अवघा 180 रुपये भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पाच ट्रक्टर कांदे रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये टाकून ते भरून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महायुतीचे केंद्र आणि राज्यातील सरकार हे भांडवलदार आणि श्रीमंतांचे सरकार आहे. या सरकारला शेतकरी आणि गोरगरिबांचे काहीही घेणे-देणे नाही. राज्य सरकार शेतकरी विरोधात आहे, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

वडगाव पान येथे कांद्याला 180 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. सरकारकडे पैसे नसल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या रस्तेदुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी पाच ट्रक्टर कांदे खड्डय़ांमध्ये टाकून खड्डे भरून घेतले. यावेळीही आमच्याकडून सरकारला मदत, असा संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.

यावेळी माजी चेअरमन बाबा ओहोळ, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, गणेश गडगे, आबासाहेब थोरात, विक्रम ओहोळ, प्रशांत थोरात, कैलास थोरात, बाबासाहेब थोरात, मनोज थोरात, नीलेश थोरात, संभाजी थोरात, मंगेश थोरात, अजय थोरात, सोमनाथ कुळधरण, नरेंद्र वायकर, संदीप काशीद, धनंजय थोरात, सतीश थोरात, सुनील थोरात, अविनाश थोरात, गणपत थोरात यांच्यासह युवक व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ही तर शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच – गायकवाड

n बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, राज्यातील महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी आहे, त्यांना गोरगरीब शेतकऱ्यांचे काही घेणे-देणे नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतीमालाला हमीभाव देऊ, अशा घोषणा निवडणुकीत करण्यात आल्या. मात्र, आता तसे काही झाले नाही. उलट आज कांद्याला क्विंटलला 180 रुपये भाव ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे. सरकारकडे पैसे नाहीत, घोषणाबाजी मात्र खूप करतात. त्यामुळेच रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी आम्ही शेतकरी पाच ट्रक्टर भरून कांदे सरकारला देत आहोत, असा संताप गायकवाड यांनी व्यक्त केला.

सरकारविरोधात लढा उभारा – विक्रम ओहोळ

n विक्रम ओहोळ म्हणाले, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात कृषी व महसूलमंत्री असताना त्यांनी कायम शेतकऱ्यांना मदत केली. आत्ताचे कृषिमंत्री, महसूलमंत्री यांना शेतकऱ्यांचे काही पडलेले नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा सुरू असून, या सरकार विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारचे दिवस भरलेत – थोरात

n तरुणांना काम नाही, बेरोजगारी वाढली आहे. शेतीमालाला भाव नाही, अशी स्थिती असताना तरुणांना मोबाइलमध्ये गुंतवून ठेवण्याचे काम या लोकांनी केले आहे. इन्स्टाग्रामच्या जमान्यात वेगवेगळ्या रील्स तयार करायच्या. अभद्र टीका करायची, असे उद्योग सुरू आहेत. या सरकारचे दिवस आता भरले असून, सर्वसामान्य नागरिक पेटला आहे. महायुती सरकारला खाली खेचण्यासाठी युवकांनी एकत्र येऊन लढा उभारावा, असे आवाहन नीलेश थोरात यांनी केले.

Comments are closed.