जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई, 11 जण तडीपार! एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश


जालना गुन्हे: जालना जिल्ह्यात निवडणुकांचा काळ जवळ येत असताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून जिल्ह्यात एकापेक्षा अधिक गुन्हे करून दहशत पसरवणाऱ्या टोळ्या आणि वाळू माफियांविरोधात पोलिसांनी तडीपारची कारवाई केलीय. जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याने सादर केलेल्या प्रस्तावावर सुनावणी केल्यानंतर एकूण 11 आरोपींना जालना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत एक वर्षासाठी त्यांच्यावर ही हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांचे आदेश जारी केलेत. (crime News)

JalnaCrime: नेमके प्रकरण काय?

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी जवळील गोंदी आणि सिद्धेश्वर फाटा परिसरात हे आरोपी सक्रिय होते. गेल्या काही महिन्यांपासून या भागात वाळू चोरी, मारहाण, खंडणी आणि दहशत निर्माण करणाऱ्या घटनांची मालिका सुरु होती. पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीच्या बेकायदेशीर कारवायांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. या सर्वांविरुद्ध शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. निवडणुकीदरम्यान या टोळ्यांकडून कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, जालन्यातील पोलिसांकडून अजून काही गुन्हेगारांवर हद्दपारी आणि MPDA (Maharashtra Prevention of Dangerous Activities Act) अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, येत्या काही दिवसांत आणखी काही आरोपींवरही अशाच प्रकारची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस अधीक्षक बंसल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, निवडणुकांचा काळ शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी.

हद्दपार झालेले आरोपी

किशोर प्रभु खराद, विकास सुरेश खराद, मनोज सुरेश खराद, ऋषीकेश विश्वंभर खराद, डिगांबर रघुनाथ शिंदे, आजीनाथ दत्ता शिंदे, अक्षय राजाभाऊ बाणाईत, सोपान दिनकर खराद, राहुल बळीराम खराद, गणेश कैलास मरकड आणि अवधुत दत्ता मिटकुल हे सर्वजण अंबड तालुक्यातील गोंदी व सिद्धेश्वर फाटा परिसरातील रहिवासी आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.