ट्रम्प आले ताळ्यावर? ‘अमेरिकेकडे पुरेसे प्रतिभावान लोक नाही’ म्हणत H-1B व्हिसा योजनेचे केले समर्थन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनाच्या कठोर इमिग्रेशन सुधारणांवरील भूमिकेत काहीशी नरमाई आणल्याचे पाहायला मिळत आहे. ते म्हणाले की, अमेरिकेला विशिष्ट क्षेत्रांसाठी परदेशी प्रतिभेला (foreign talent) देशात आणण्याची गरज आहे. ट्रम्प यांनी हे मान्य केले की, दीर्घकाळ बेरोजगार असलेल्या अमेरिकन नागरिकांना संरक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये व्यापक प्रशिक्षणाशिवाय महत्त्वाच्या भूमिका सोपवता येणार नाहीत आणि अशा भूमिकांसाठी अमेरिकेला कुशल परदेशी नागरिकांची (skilled foreign nationals) आवश्यकता आहे.

अमेरिकेन वृत्तवाहिनी फॉक्स न्यूजच्या लॉरा इंग्राहाम यांच्याशी बोलत असताना, ट्रम्प यांना विचारले गेले की त्यांचे प्रशासन H-1B व्हिसाचे प्राधान्य कमी करण्याची योजना आखत आहे का? त्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘प्रतिभावान लोकांना आणावेच लागते’.

आपल्याकडे खूप प्रतिभा आहे, असे लॉरा यांनी म्हणताच ट्रम्प म्हणाले की, ‘नाही, आपल्याकडे नाही’.

ते म्हणाले, ‘आपल्याकडे काही विशिष्ट प्रतिभा (certain talents) नाही… आणि लोकांना शिकावे लागते, तुम्ही लोकांना बेरोजगारीच्या रांगेतून काढून ‘मी तुम्हाला कारखान्यात कामाला लावणार आहे. आपण क्षेपणास्त्रे बनवणार आहोत’ असे म्हणू शकत नाही.’

२०२४ मध्ये एकूण मंजूर झालेल्या H-1B व्हिसापैकी ७० टक्क्यांहून अधिक व्हिसा हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांना मिळाले, याचे मुख्य कारण मंजुरीमध्ये मोठा बॅकलॉग आणि हिंदुस्थानातून येणाऱ्या कुशल स्थलांतरितांची मोठी संख्या हे आहे.

H-1B व्हिसा कार्यक्रमावर प्रशासनाच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे वक्तव्य केले आहे. सप्टेंबरमध्ये, ट्रम्प यांनी एका घोषणेद्वारे नवीन H-1B व्हिसा अर्जांवर $१,००,००० (एक लाख डॉलर्स) इतकी मोठी फी लादली होती.

गेल्या आठवड्यात, यूएस डिपार्टमेंट ऑफ लेबर (DOL) ने H-1B व्हिसा कार्यक्रमातील संभाव्य गैरवापरांबद्दल किमान १७५ तपास सुरू केले. ‘प्रोजेक्ट फायरवॉल’ नावाचा हा उपक्रम, व्हिसा प्रणालीचा कथितपणे गैरवापर करणाऱ्या कंपन्यांना लक्ष्य करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. ही व्हिसा प्रणाली यूएस कंपन्यांना माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि आरोग्यसेवा यांसारख्या विशेष व्यवसायांमध्ये परदेशी कामगारांना कामावर ठेवण्याची परवानगी देते.

ऑक्टोबरमध्ये, फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटिस यांनी राज्याच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सला राज्य विद्यापीठांमध्ये H-1B व्हिसाचा वापर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, सध्या व्हिसा धारकांकडे असलेल्या जागा फ्लोरिडा येथील रहिवाशांनी भरल्या पाहिजेत.

डिसँटिस म्हणाले, ‘आमचे ॲक्रिडिटेशन तपासण्यासाठी आम्ही H-1B व्हिसावर लोकांना का आणत आहोत? आम्ही हे काम आमच्या लोकांमार्फत करू शकत नाही का?’ ते पुढे म्हणाले की, ही प्रथा अल्प दरातील कामगार देण्यासारखी आहे आणि त्यांनी विद्यापीठाच्या प्रमुखांना कामावर घेण्याच्या पद्धतींचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आवाहन केले.

काही दिवसांनंतर, व्हाईट हाऊसने पुन्हा सांगितले की H-1B व्हिसा कार्यक्रमात सुधारणा करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राधान्य ‘अमेरिकन कामगारांना प्रथम स्थान’ देण्याचे आहे आणि प्रशासनाच्या कठोर उपाययोजनांविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांशी लढण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.

Comments are closed.