ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय, तुळजापूर प्रकरणातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना खरमरीत पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून चिंता वाटली, असा टोला सुप्रिया सुळे यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचाही समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता वाटली, असे सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
प्रति
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मंत्रालय, मुंबईविषय : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीने कारवाई करणेबाबत..
मा. सर,
प्रेमाने अभिवादन,तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये…
— सुप्रिया सुळे (@supriya_sule) 12 नोव्हेंबर 2025
तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी अपेक्षा आहे. ड्रग्ज तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही, अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल ही अपेक्षा आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटले आहे.
Comments are closed.