IND vs SA: ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीबाबत गंभीर आणि गिल असमाधानी? जाणून घ्या नेमकं कारण
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील (Team india vs South Africa) कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयारीचा वेग वाढवला आहे. अलीकडच्या काळात टीम इंडिया कसोटी सामन्यांमध्येही फलंदाजांसाठी अनुकूल अशा खेळपट्ट्यांवर खेळत आहे. मात्र, आता अशी माहिती समोर आली आहे की कर्णधार शुबमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Shubman gill & Head Coach Gautam Gambhir) हे ईडन गार्डन्सच्या पिचवर समाधानी नाहीत. नव्या रिपोर्ट्समध्ये याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना कोलकाता कसोटीपूर्वी ईडन गार्डन्सच्या पिच क्युरेटर सुजान मुखर्जी यांच्याशी दीर्घ चर्चा करताना पाहण्यात आले. त्यानंतर गंभीर यांनी फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक, कर्णधार शुबमन गिल आणि गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कल यांच्यासह पुन्हा एकदा मुखर्जी यांच्याशी सविस्तर संवाद साधला.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार भारतीय कर्णधार आणि प्रशिक्षक दोघेही पिचबद्दल विशेष खुश नाहीत. रिपोर्ट्समध्ये नमूद केल्याप्रमाणे पिचचा रंग थोडा भूरकट दिसत आहे आणि त्यावर थोडीशी गवताचा ठिपकेदार थर आहे. सामना शुक्रवारपासून सुरू होणार असल्याने पिचमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे टीम इंडियाला याच पिचवर खेळावे लागणार आहे.
बंगाल क्रिकेट संघाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी स्पष्ट केले होते की, टीम इंडियाने या कसोटीसाठी टर्निंग पिच (स्पिनर्ससाठी अनुकूल पिच) मागितली नव्हती. या विषयावर प्रश्न विचारल्यावर गांगुली म्हणाले, “अजूनपर्यंत त्यांनी अशा खेळपट्टीची मागणी केलेली नाही, त्यामुळे मी त्याबाबत काही सांगू शकत नाही. खेळपट्टी सध्या चांगली दिसत आहे.
रिपोर्टनुसार, या रणजी हंगामात ईडन गार्डन्सवर दोन सामने खेळले गेले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये पिच धीमी होती. त्या सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नव्हती.
Comments are closed.