सावधान! मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट

दिल्लीतील बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. त्यातच आता देशातील 5 विमानतळे बाँम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाल्या आहेत. देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत इंडिगो एअरलाइन्सला बुधवारी दुपारी 3.30 वाजता मेल आला आहे. या ईमेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या पाच विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर खळबळ उडाली आहे. हा मेल कुणी आणि कुठून पाठवला याची चौकशी करण्यात येत आहे.

मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला. या विमानाचे तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, त्यानंतर बॉम्ब निकामी पथकाने विमानाची कसून तपासणी केली. मात्र यात आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देशातील बहुतेक विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विमानतळांच्या आत आणि बाहेर सीआयएसएफ आणि विमानतळ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. श्वान पथके आणि बॉम्ब निकामी पथकांनाही सतर्क ठेवण्यात आले आहेत.

Comments are closed.