Health Tips: मुलांना चहा-कॉफी देण्याचं योग्य वय कोणतं?
हिवाळ्याच्या दिवसांत लहान मुलांना सर्दी, खोकला आणि कफाचा त्रास वारंवार होतो. अशा वेळी अनेक घरांमध्ये मोठी मंडळी सांगतात की, “थोडा चहा दे, बरं वाटेल.” काहीजण तर रोज सकाळ-संध्याकाळ मुलांना चहा देतात. पण खरंच हे योग्य आहे का? चहा मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानदायक? चला याबद्दल जाणून घेऊया. ( tea for kids right age to drink tea or coffee)
मुलांसाठी चहा का टाळावा?
तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये ‘टॅनिन’ नावाचं घटक असतं. हे घटक शरीरात आयर्न म्हणजेच लोह शोषण्याची क्षमता कमी करतात. त्यामुळे चहा पिणाऱ्या मुलांच्या शरीरात आयर्नचं प्रमाण घटतं. लहान मुलांना आधीच भाज्या आणि डाळी कमी प्रमाणात आवडतात. त्यावर चहा दिला तर त्यांच्या शरीराला आवश्यक आयर्न मिळत नाही आणि त्यामुळे ते लवकर थकतात, अशक्तपणा येतो आणि चिडचिडेपणा वाढतो.
मानसिक विकास आणि झोपेवर परिणाम
चहामध्ये असलेलं ‘कॅफीन’ मेंदूला उत्तेजित करतं. प्रौढांसाठी ते तात्पुरता ताजेपणा आणू शकतं, पण लहान मुलांमध्ये याचा परिणाम झोपेवर आणि मेंदूच्या विकासावर होतो. मुलांची झोप पूर्ण न झाल्यास त्यांचा मेंदू योग्यरित्या वाढत नाही. त्यामुळे वय कमी असताना चहा किंवा कॉफी देणं टाळणं आवश्यक आहे.
वाढत्या वयात होणारे दुष्परिणाम
लहानपणापासून चहा देण्याची सवय लावल्यास मुलांना त्यावर अवलंबून राहण्याची शक्यता वाढते. त्याचा परिणाम त्यांच्या पचनसंस्थेवर आणि हृदयगतीवर होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये मुलांमध्ये ‘पायका डिसऑर्डर’सारखी सवय दिसून येते, जिथे मुले माती, भिंत किंवा खडू चाटण्याची प्रवृत्ती दाखवतात ही गोष्ट अत्यंत धोकादायक ठरू शकते.
योग्य वय आणि पर्याय काय?
डॉक्टरांच्या मते, १२ वर्षांपूर्वीच्या मुलांना चहा किंवा कॉफी देणं टाळावं. त्या वयोगटासाठी दूध आणि पाणी हीच सर्वोत्तम पेय आहेत. सर्दी-खोकल्यासाठी चहाऐवजी हळदीचं दूध, मध-पाणी किंवा घरगुती आयुर्वेदिक काढा हे सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय आहेत.
मुलांना चहा देऊन त्यांना सर्दीपासून आराम मिळतो ही समजूत चुकीची आहे. त्यामुळे पालकांनी पारंपरिक सल्ले ऐकण्याआधी थोडं विचार करणं गरजेचं आहे. लहान मुलांची शरीररचना आणि प्रतिकारशक्ती अजून विकसित होत असते. अशावेळी नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय निवडणंच योग्य ठरतं.
Comments are closed.