मुळशी येथे पशुसंवर्धनचा 15 एकर भूखंड परस्पर विकला, पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा… पुन्हा बावनकुळेंच्याच खात्यात ‘गुपचूप’ लोचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या भूखंड घोटाळ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खात्याचा पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. मुळशी ताथवडे येथील पशुसंवर्धन खात्याची 15 एकर जमीन परस्पर विकल्याचे समोर आले आहे. हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीच्या वारसांनी बेकायदा शासकीय जमीन विक्री करून दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी केल्याचा कारनामा उघडकीस आला आहे. यानंतर हवेलीच्या सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील पशुसंवर्धन विभागाच्या सर्वे नंबर 20 येथील 15 एकर जागेची कोटय़वधी रुपयांना परस्पर विक्री करण्यात आली. हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीच्या वारसदारांनी जानेवारी 2025मध्ये पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून या जागेची विक्री केली. अकरा महिन्यांपूर्वी बेकायदा विक्री झालेल्या या जमीन विक्री व्यवहाराचे दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार केली. यासंदर्भात पुण्याचे विभागीय आयुक्त व पशुसंवर्धन विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी पशुसंवर्धन विभागाचा तक्रार अर्ज आला आहे. त्यानुसार चौकशी केली जात आहे. चौकशीत जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कोळी यांनी सांगितले.

प्रकरण नेमके काय…

ताथवडे येथे पशुसंवर्धन खात्याची 72 हेक्टर (सुमारे 178 एकर) जागा आहे. त्यातील एका गटातील 15 एकर जागेवर पशुसंवर्धन खात्याचे नाव इतर अधिकारात आहे. त्यामुळे खात्याच्या परवानगीशिवाय जमिनीचा व्यवहार करता येत नाही. संबंधित जागा हेरंब गुपचूप यांच्या खासगी मालकीची असली तरी इतर अधिकारात पशुसंवर्धन खात्याची नोंद आहे.

या जागेसंदर्भात हायकोर्टात मालकाने दावा दाखल केला होता. त्या दाव्याच्या निकालात कोर्टाने मालकीसंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे सातबारा उताऱयावर इतर अधिकारात पशुसंवर्धन खात्याचे नाव आजही कायम आहे. तरीही जानेवारी 2025मध्ये हेरंब गुपचूप यांच्या वारसदारांनी या जागेचा विक्री व्यवहार केला.

ताथवडे येथील सर्व्हे नं. 20मधील 6 हेक्टर 32 आर क्षेत्राची जमीन विक्रीचा दस्त क्रमांक 685/2025 दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी नोंदविण्यात आला. मात्र नोंदणी करताना अद्ययावत 7/12 उतारा जोडला नव्हता. दस्तासोबत 2023मधील जुना 7/12 जोडण्यात आला होता ज्यावर शासनाचा ताबा किंवा विक्रीवरील बंदीचा उल्लेख नव्हता.

फेब्रुवारी 2025मधील 7/12 उताऱयावर या जमिनीवर आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा असून शासनाच्या परवानगीशिवाय विक्रीस बंदी, असा शेरा आहे. तरीही निबंधकांनी तांत्रिक अडचणीमुळे म्युटेशन होत नव्हते म्हणून ‘स्किप ऑप्शन’ वापरून दस्त नोंदविला. परंतु यासाठी त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतलेली नव्हती.

ही गंभीर अनियमितता मानून सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 अंतर्गत 12 नोव्हेंबर 2025पासून पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई येथे राहील.

750 कोटींची जमीन 33 कोटींत विकली

पशुसंवर्धन विभाग जमीन विक्री व्यवहारातील मुख्य मयत व्यक्ती हेरंब गुपचूप यांचा 1982मध्ये मृत्यू झाला आहे. त्यांच्या जवळपास 22 वारसदारांनी एकत्र येत 750 कोटी रुपये बाजार मूल्य असणारी ही जमीन अवघ्या 33 कोटी रुपयांत कपिल फकीर आणि सय्यद फैयाज मीर अजिमोद्दीन यांना जानेवारी 2025मध्ये विकल्याची माहिती समोर आली आहे.

एनओसी न घेता व्यवहार

ताथवडे येथील शासनाच्या मालकीच्या जमिनीचा पशुसंवर्धन विभागाची एनओसी न घेता व्यवहार झाला. पशुसंवर्धन विभागाच्या परवानगीशिवाय या जागेची विक्री करण्यात येऊ नये असा शेरा असतानादेखील हेरंब गुपचूप यांच्या वारसदारांनी ही जमीन विकली, अशी माहिती ताथवडे येथील फार्म मॅनेजर अमोल आहेर यांनी दिली. आता या प्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Comments are closed.