Children’s Day 2025: बालदिनाशी संबंधित रंजक गोष्टी; प्रत्येक व्यक्तीला असाव्या माहित

भारतात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. लहान मुलं ही देशाचं भविष्य आहेत याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की या दिवसाचा इतिहास, उद्देश आणि काही रंजक गोष्टी? पंडित जवाहरलाल नेहरूंचा असा विश्वास होता की मुलांच्या माध्यमातून भविष्य घडवले जाऊ शकते, त्यामुळे मुलांना केवळ शिक्षणच नव्हे तर विचाराचे स्वातंत्र्य स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य देणं देखील महत्त्वाचं असतं. ( Children’s Day 2025 )

बालदिन का साजरा केला जातो? (बालदिन का साजरा केला जातो)
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. नेहरूंना लहान मुलांबद्दल विशेष प्रेम होतं. आजची मुले उद्याच्या भारताचे शिल्पकार आहेत असं ते मानत. मुलांवरील त्यांच्या प्रेमामुळे त्यांना ‘चाचा नेहरू’ या नावाने ओळखले जाते.

बालदिन पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला?
भारतात बालदिनाची सुरुवात १९५६ मध्ये २० नोव्हेंबर रोजी झाली, जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी घोषित केल्यावर हा दिवस सार्वत्रिक बालदिन म्हणून साजरा केला. २७ मे १९६४ रोजी नेहरूंच्या निधनानंतर, त्यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबर हा भारताचा राष्ट्रीय बालदिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी मुलांसाठी साजरा करतात.

बालदिनाचा उद्देश काय आहे?
या दिवसाचा मुख्य उद्देश मुलांच्या हक्कांबद्दल आणि शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करणे. बालमजुरी, बालगुन्हेगारी आणि भेदभाव रोखणं. मुलांना प्रेम, आदर आणि समान संधी प्रदान करणे आणि त्यांच्या विकासासाठी प्रोत्साहित करणं असा आहे. मुलांचे हास्य, खेळणे आणि शिकणे हे राष्ट्राच्या प्रगतीचा पाया असल्याचं मानत हा दिवस साजरा करतात.

बालदिन कसा साजरा केला जातो?
देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि संस्था या दिवशी मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन आणि विशेष वर्ग उपक्रम आयोजित करतात. अनेक ठिकाणी शिक्षक आणि पालक मुलांना भेटवस्तू आणि मिठाई देतात. माध्यमे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही मुलांच्या हक्कांशी संबंधित संदेश शेअर केले जातात.

Comments are closed.