सांगलीत रक्तरंजित थरार, मोहितेंना मारायला आलेल्या शाहरुखच्या पायावर घाव बसला, मुख्य रक्तवाहिनी


सांगली दुहेरी हत्याकांड : सांगलीच्या गारपीर चौकाजवळ असलेल्या इंदिरा नगर परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या रक्तरंजित संघर्षाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. सांगलीतील दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते (Uttam Mohite Murder) यांची गुंडांच्या टोळक्याने निर्घृणपणे हत्या केली होती. या टोळक्याने उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसालाच (Birthday) त्यांची हत्या केली होती. उत्तम मोहिते आणि आरोपी गणेश मोरे यांच्यात पूर्वीपासून वाद होते. या दोन्ही गटांनी इंदिरा नगर परिसरात (Indira Nagar) ‘रस्त्याच्या अलीकडे आमची हद्द, पलीकडे तुमची हद्द’, अशी अलिखित विभागणी केली होती. या दोन गटांमध्ये यापूर्वीही मारामाऱ्या झाल्या होत्या. मात्र, मंगळवारी उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या वादाने कळस गाठला आणि त्याचे पर्यवसन दुहेरी हत्याकांडात झाले. उत्तम मोहिते यांना मारण्यासाठी आलेल्या टोळक्यातील शाहरुख शेख याचाही यावेळी मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गणेश मोरे, सतीश लोखंडे, शाहरूख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे आणि समीर ढोले या आठ जणांवर गुन्हा दाखल केला होता. (Sangli News)

उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यासाठी इंदिरानगर येथील त्यांच्या घरापासून काही अंतरावर मांडव टाकून वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश मोरे आणि त्याचे साथीदार चाकू, लोखंडी रॉड, काठी आणि धारदार शस्त्रे घेऊन त्याठिकाणी आले आणि त्यांनी उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला.

हा सगळा वाद वर्चस्ववादाच्या लढाईतून झाल्याचे समोर आले आहे. सांगलीतील शासकीय रुग्णालयाचा परिसर हा सध्या गुन्हेगारीचा हॉटस्पॉट झाला आहे. या भागातील इंदिरा नगर परिसरातील उत्तम मोहिते आणि गणेश मोरे यांच्या गटात पूर्वीपासूनच वाद होता. गणेश मोरे आणि त्याचे काही साथीदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.  मोरे आणि मोहिते गँगमध्ये इंदिरा नगर परिसराची विभागणी झाली होती. मात्र, वर्चस्व गाजवण्याच्या खुमखुमीमुळे उत्तम मोहिते यांची हत्या झाली.

Sangli  Crime news: दरवाजातील दगडाने उत्तम मोहितेंचा घात केला

सांगलीतील या भयानक हत्याकांडाचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये सगळा घटनाक्रम दिसत आहे. उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम संपला होता. त्यानंतर ते घरी जेवण्यासाठी निघाले होते. तेव्हा गणेश मोरे आणि त्याचे साथीदार शिवीगाळ करत त्याठिकाणी आले. त्यांच्या हातांमध्ये धारदार शस्त्रं होती. ही शस्त्रं बघून उत्तम मोहिते यांना आपल्यावर हल्ला होणार, याचा अंदाज आला. त्यामुळे ते धावत आपल्या घराकडे सुटले. हल्लेखोरांना मागे टाकून ते आपल्या घरातही शिरले होते. मात्र, त्यांच्या घराच्या दरवाज्यात दार बंद होऊ नये म्हणून एक दगड ठेवला होता. उत्तम मोहिते घरात शिरल्यानंतर त्यांनी दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडामुळे त्यांचा दरवाजा बंद झाला नाही आणि मागून धावत आलेल्या हल्लेखोरांना संधी मिळाली. हल्लेखोरांनी जोर लावून दरवाजा मागे ढकलला आणि ते आत शिरले. त्यानंतर घराच्या किचनमध्ये जाऊन हल्लेखोरांनी उत्तम मोहिते यांना जमिनीवर आडवे पाडले आणि त्यांच्यावर गुप्ती, दांडके आणि धारदार शस्त्रांनी एकामागोमाग एक घाव घातले. त्यामुळे उत्तम मोहिते यांचा जागेवरच मृत्यू झाला.

Sangli News: साथीदारांचा घाव शाहरुखच्या पायावर बसला अन् रक्तवाहिनी फुटली

या घटनेत उत्तम मोहिते यांना मारण्यासाठी आलेल्या शाहरुख शेख याचाही मृत्यू झाला. हल्लेखोर त्वेषाने उत्तम मोहिते यांच्यावर धारदार शस्त्राने एकामागोमाग एक वार करत होते. त्यावेळी एक घाव चुकून शाहरुख शेख याच्या पायावर बसला. हा घाव इतका जोरदार होता की, शाहरुख शेख याच्या पायाला खोलवर जखम झाली. त्याच्या पायाची मुख्य रक्तवाहिनी तुटली आणि प्रचंड रक्तस्राव सुरु झाला. गणेश मोरे आणि इतर साथीदारांनी शाहरुखला उचलून रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आणखी वाचा

सांगली हादरली! नेत्याच्या वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार, उत्तम मोहितेंनी जागेवरच प्राण सोडले

आणखी वाचा

Comments are closed.