अपघाताची कारणे शोधण्यासाठी तपास

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अहमदाबाद येथे एअर इंडिया विमानाला झालेल्या अपघाताचा तपास हा दोषारोप करण्यासाठी होत नसून तो अपघाताची खरी कारणे शोधण्यासाठी आणि असे अपघात पुन्हा होऊ नयेत, अशी व्यवस्था करण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे या तपासासंबंधात कोणी चुकीचा समज करुन घेऊ नये, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. अपघातग्रस्त विमानाचे एक चालक सुमित सभरवाल यांचे पिता पुष्कराज सभरवाल यांनी या संदर्भात याचिका सादर केली आहे. या याचिकेवर गुरुवारी पुढची सुनावणी करण्यात आली आहे.

महाधिवक्ता तुषार मेहता यांनी केंद्र सरकारच्या वतीने युक्तीवाद केला. विमानचालकाच्या पित्याच्या भावना आम्ही समजू शकतो. हा तपास विमान चालकांना दोषी ठरविण्यासाठी नसून या अपघाताची कारणे आणि वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आहे. भविष्यात असे अपघात होऊ नयेत, यासाठी कोणती पूर्वसज्जता करणे आवश्यक आहे, हे या तपासातून स्पष्ट होणार आहे. हा तपास  भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असा युक्तीवाद मेहता यांनी केला.

न्यायालयीन चौकशी आवश्यक

गंभीर विमान अपघातांची चौकशी केवळ एएआयबीकडून होणे पुरेसे नाही. नियमांच्या अनुसार ही चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची आवश्यकता आहे, असा युक्तीवाद एका याचिकाकर्त्या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला. केंद्र सरकार सर्व नियमांचे पालन करुन हा तपास करीत आहे, असे प्रत्युत्तर महाधिवक्ता तुषार मेहता यांनी नंतर दिले.

Comments are closed.