बिहारमध्ये राष्ट्रवादीची धूळधाण, उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मतं, 15 पैकी 13 उमेदवारांचं


अजित पवार राष्ट्रवादी बिहार निवडणूक 2025: राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी प्रभाव टाकू शकणाऱ्या आणि देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्याच्यादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Results 2025) आज जाहीर होत आहे. आज सकाळी आठ वाजता आधी पोस्टल आणि नंतर ईव्हीएम यंत्रातील मतांच्या मोजणीला सुरुवात झाली. यामध्ये सुरुवातीचा एक तास वगळता राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. सध्याच्या कलांनुसार, बिहारमध्ये भाजप 84, जदयू 78 जागांवर आघाडीवर आहे. तर राजद 32 आणि काँग्रेसचे उमेदवार अवघ्या सात जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे एकूण 243 जागांपैकी 191 जागांवर एनडीए आणि महागठबंधन आघाडीचे उमेदवार अवघ्या 48 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागण्याची शक्यता आहे. या सगळ्यात महाराष्ट्राच्यादृष्टीने लक्ष वेधून घेणारी आणखी एक गोष्ट म्हणजे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवारांचे झालेले पानिपत. बिहार विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाने 15 उमेदवार रिंगणात उतरवले होते.

आज सकाळपासून बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एकाही उमेदवाराला जिंकणे तर दूर सोडा पण आघाडीही घेता आलेली नाही. 15 पैकी 13 जागांवर अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. अजित पवारांच्या या उमेदवारांना अद्याप ५०० मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. हे चित्र कायम राहिल्यास बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागणार आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना या पक्षाने देशभरात बऱ्यापैकी हातपाय पसरले होते. झारखंड, गोवा, गुजरात, केरळ, नागालँड आणि मेघालय  या राज्यांमधून पक्षाचे आमदार आणि खासदार निवडून येत होते. तारिक अन्वर यांच्यारुपाने बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला होता. त्यामुळे अजित पवार यांनी हा राष्ट्रीय दर्जा परत मिळवण्याच्या आशेने बिहारच्या निवडणुकीत एनडीएसोबत फारकत घेऊन स्वत:चे उमेदवार स्वतंत्रपणे रिंगणात उतरवले होते. परंतु, या सर्व उमेदवारांनी पार निराशा केल्याचे दिसत आहे.

Ajit Pawar news: अरेरे! अजितदादांच्या एकाही उमेदवाराला 500 मतंही मिळाली नाहीत

नौटन विधानसभा मतदारसंघ- जय प्रकाश (43 मतं)
पिंप्रा विधानसभा मतदारसंघ- अमित कुमार कुशवाह (370 मतं)
मनिहारी विधानसभा मतदारसंघ- सैफ अली खान (196)
पारसा विधानसभा मतदारसंघ- बिपीन सिंह (144)
सोनेपूर विधानसभा मतदारसंघ- धर्मवीर कुमार (25)
महुआ विधानसभा मतदारसंघ- अखिलेश कुमार ठाकूर (149)
राघोपूर विधानसभा मतदारसंघ- अनिल सिंह (147)
बाखरी विधानसभा मतदारसंघ- विकास कुमार (127)
अमरपूर विधानसभा मतदारसंघ- अनिल कुमार सिंह (52)
पटना साहिब विधानसभा मतदारसंघ- आदिल आफताब खान (192)
मोहानिया विधानसभा मतदारसंघ- मुन्ना कुमार (80)
सासाराम विधानसभा मतदारसंघ- आशुतोष सिंह (21)
दिनारा विधानसभा मतदारसंघ- मनोज कुमार सिंह (53)

नरकटियागंज विधानसभा मतदारसंघ- राशिद अझीम
राजनगर विधानसभा मतदारसंघ- हरिलाल पासवान

आणखी वाचा

Comments are closed.