IND vs SA : बुमराहचा पंजा! दक्षिण आफ्रिकेचं स्वस्तात पॅकअप, टीम इंडियाने 159 धावांत गुंडाळलं
कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्याच दिवशी पाहुण्या संघाला धुळ चारली. भारतीय गोलंदाजांनी अचूक लाईन-लेंथ, वेगवान मारा आणि फिरकीची धार याचा योग्य समन्वय साधत दक्षिण आफ्रिकेला केवळ 55 षटकांत 159 धावांवर गुंडाळले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी दडपण कायम ठेवत विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. ओपनर एडन मारक्रमने सर्वाधिक 31 धावा करत काहीसा जोश दाखवला. त्याच्याशिवाय वियान मुल्डर (24), टॉनी डी झॉर्झी (24), रायन रिकेल्टन (23) आणि काइल वेरेन (16) यांच्याकडून मोठे योगदान मिळाले नाही. शिवाय कोणालाही मोठी खेळी साकारता आली नाही. ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 15 धावा केल्या, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याशिवाय टेम्बा बावुमा (3) आणि इतर फलंदाजांना दहाच्या आतच तंबू हाकावा लागला. मार्को आणि केशव महाराज तर खातेही उघडू शकले नाहीत.
भारतीय गोलंदाजांपैकी जसप्रीत बुमराह हा दिवसाचा हिरो ठरला. त्याने केवळ 27 धावांच्या मोबदल्यात दक्षिण आफ्रिकेचे पाच महत्त्वाचे बळी टिपत ‘फायफर’ नोंदवला. बुमराहने एडन मारक्रम, रायन रिकेल्टन, टॉनी डी झॉर्झी, सायमन हार्मर आणि केशव महाराज यांना बाद करत आफ्रिकन डाव कोसळण्यास मोठे कारण ठरला. त्याची ही कसोटी कारकिर्दीतील 16 वी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची चौथी पाच विकेट्सची कामगिरी आहे. केपटाऊनमध्ये 2024 मध्ये मिळवलेल्या 6/61नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही त्याची दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.
बुमराहव्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अक्षर पटेलने एक विकेट उचलली. तिन्ही सत्रांमध्ये भारताने गोलंदाजीची पकड कायम ठेवत आफ्रिकेला रोखून ठेवले.
पहिल्या दिवशीचा खेळ संपताना भारताने एक विकेट गमावून 37 धावा केल्या आहेत.
Comments are closed.