टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू लग्नासाठी तयार; मालिकेच्या मध्यातच संघाबाहेर जाणार, BCCIला सुट्टीचा अर्ज
टीम इंडियाचा विश्वासू फिरकीपटू कुलदीप यादव लवकरच सात फेऱ्या घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने बीसीसीआयकडे काही दिवसांच्या सुट्टीची विनंती केली आहे. सध्या भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेची धावपळ सुरू असून, त्यानंतर वनडे आणि टी20 सामनेही रंगणार आहेत. सुट्टी मंजूर झाली, तर कुलदीप मालिकेच्या मध्यात संघातून बाहेर पडू शकतो.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार, महिन्याच्या अखेरीस कुलदीपच्या विवाहसोहळ्याची तयारी जोरात आहे. आधी आयपीएल पुढे ढकलल्याने त्यांचा लग्नाचा सारा बेत नव्या तारखांसाठी थांबवावा लागला होता. मात्र, आता पुन्हा एकदा योग्य वेळ मिळताच कुटुंबीयांनी सर्व तयारी सुरू केली असून, कुलदीपनेही बीसीसीआयला रजेचा अधिकृत अर्ज सादर केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कुलदीपला नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुट्टी हवी आहे. या कालावधीत भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेतील दुसरी कसोटी (22 नोव्हेंबर – गुवाहाटी) आणि पहिला वनडे (30 नोव्हेंबर – रांची) खेळवला जाणार आहे. रजा मंजूर झाली, तर ही दोन्ही सामने तो गाठू शकणार नाही. विशेष म्हणजे कुलदीपचा साखरपुडा त्याच्या मैत्रीण वंशिकासोबत याआधीच झाला आहे. वंशिका एलआयसीमध्ये काम करते आणि दोघेही अनेक वर्षे एकमेकांना ओळखतात.
सामन्याबद्दल बोल्याचे झाल्यास भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना आफ्रिकेला केवळ 159 धावांत गुंडाळले. ज्यामध्ये जसप्रीत बुमराहने आक्रमक कामगिरी केली. त्याने केवळ 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. बुमराहने एडन मारक्रम, रायन रिकेल्टन, टॉनी डी झॉर्झी, सायमन हार्मर आणि केशव महाराज यांना बाद करत आफ्रिकन डाव कोसळण्यास मोठे कारण ठरला.
बुमराहव्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अक्षर पटेलने एक विकेट उचलली. तिन्ही सत्रांमध्ये भारताने गोलंदाजीची पकड कायम ठेवत आफ्रिकेला रोखून ठेवले. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना भारताने एक विकेट गमावून 37 धावा केल्या आहेत.
Comments are closed.