वैभव सूर्यवंशीची आग ओकणारी फलंदाजी! 32 चेंडूत ठोकलं शतक, पाकिस्तानची धडधड वाढली

टीम इंडियाचा उगवता सितारा वैभव सूर्यवंशीने Asia Cup Rising Stars स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात तोडफोड फटकेबाजी केली आहे. UAE च्या गोलंदाजांना वैभवने अक्षरश: फोडून काढलं आहे. चौकार आणि षटकारांची चौफेर फटकेबाजी त्याने केली आणि फक्त 32 चेंडूंमध्ये शतक ठोकलं. शतक ठोकल्यावरही त्याची बॅट शांत झाली नाही.
टीम इंडिया A आणि UAE यांच्यामध्ये दोहा येथे सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि घेतलेला निर्णय सार्थ ठरवला. सलामीला आलेला वैभव सूर्यवंशी युएईवर तुटून पडला होता. त्याने 17 चेंडूंमध्ये अर्धशतक आणि 32 चेंडूंमध्ये शतक ठोकलं. शतक ठोकल्यावरही तो गोलंदाजांना चोपत राहिला. त्याने 42 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने 144 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या वादळाचा UAE ला जोरदार तडाखा बसला. वैभव नंतर जितेशनेही 32 चेंडूंमध्ये 83 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 297 धावांचा डोंगर UAE पुढे उभा केला.
वैभव सूर्यवंशीकडून संपूर्ण आग! अवघ्या 14 व्या वर्षी, या मुलाने आशिया चषक रायझिंग स्टार्स 2025 मध्ये भारत अ विरुद्ध UAE साठी 42 चेंडूत (15 षटकार!) नाबाद 144 धावा केल्या. 32 चेंडूंचे शतक – भारतीयाचे संयुक्त दुसरे सर्वात वेगवान टी-20 शतक! बिहारचा मुलगा डोहाचा मालक आहे. #वैभवसूर्यवंशी pic.twitter.com/zKuWwZ3IVO
— 🇮🇳 लोकेश कुमार राठौर (@Lokesh12052001) 14 नोव्हेंबर 2025
टीम इंडियाने उभ्या केलेला हा डोंगर भेदताना UAE ची गाडी रुळावरून केव्हाच खाली उतरली आहे. सध्या सामना सुरू असून 15.3 षटकांचा खेळ झाला तेव्हा UAE ने 5 गड्यांच्या मोबदल्यात 124 धावा केल्या आहेत. त्यांना जिंकण्यासाठी 26 चेंडूंमध्ये 174 धावांच्या आव्हानाचा अजूनही पाठलाग करायचा आहे. टीम इंडिया A संघाचा पुढचा सामना 16 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. वैभव सूर्यवंशीचा हा रुद्रावतार पाहून पाकिस्तानची धडधड वाढली असावी, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगताना दिसत आहे.

Comments are closed.